माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन; नगर जिल्ह्यात शोककळा

माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन; नगर जिल्ह्यात शोककळा
अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचं आज दुःखद निधन झालं. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण काका जगताप यांनी राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण आणि क्रीडाक्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील अत्यंत महत्वाचे असे ते नेते होते. त्यांच्यावर अहिल्यानगर शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अरुणकाका जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदापासून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर ते नगरसेवक झाले. तत्कालीन अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी सलग पाच वर्ष उल्लेखनीय असे काम केले आहे. तसेच सलग दोनवेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केलं आहे. परंतु त्यांनी अहमदनगर शहर मतदारसंघातून त्यांना दोनदा पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु ते पुन्हा नगरसेवक झाले आणि स्वतः महापौर न होता त्यांनी आपला मुलगा संग्राम जगताप याना महापौर केले. याशिवाय क्रीडा क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग होता. ते अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य होते. शिक्षण क्षेत्रातही योगदान देताना गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. घोडेस्वारी, नव्या गाड्यांचा छंद. शेती, हॉटेल, उद्योग यामध्ये त्यांना विशेष रुची होती.
अरुणकाका जगताप यांना अहिल्यानगरचं राजकारण ढवळून काढणारा नेता म्हणूनही ओळखलं जायंचं. अनेक वर्षे नगरचं राजकारण त्यांच्याभोवतीच फिरत होत. अशा महत्त्वाच्या नेत्यानं शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. नगर शहरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे अरुणकाका जगताप यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या सून शितल संग्राम जगताप या नगरसेविका आहेत. सून स्नुषा सुवर्णा सचिन जगताप या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. सुपुत्र सचिन अरुण जगताप हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.
तर अरुण काका हे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले आणि तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे ते व्याही आहेत. तर आमदार संग्राम जगताप हे शिवाजी कर्डिले त्यांचे जावई आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अरुण काकांच्या निधनामुळे एक अनुभवी नेतृत्व हरपल्याची भावना सर स्तरातून व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी म्हटले आहे कि, माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत व्यथित करणारे आहे.अरुण जगताप यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीची सुरुवात पूर्वाश्रमीच्या अहमदनगर (आताच्या अहिल्यानगर) भागातून केली. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधान परिषदेपर्यंत त्यांनी विविध जबाबदाऱ्या अत्यंत दक्षतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडल्या. नगरसेवक, नगराध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्य करत असताना त्यांनी जनसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही कायम सोबत आहोत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे कि, माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचं निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी हानी आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे कि, माझे व्यक्तिगत मित्र आणि विधिमंडळातील सहकारी
अरूणकाका जगताप यांच्या निधनाच वृत अत्यंत वेदनादायी आहे.अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते.रूग्णालयात जावून त्यांच्या तब्येतीची माहीती उपचार करणार्या डाॅक्टरांकडून जाणून घेत होतो. परंतू केलेल्या प्रयत्नांना यश येवू शकले नाही.
याचे दु:ख आहे.
अतिशय तरूण वयात अरुणकाकांनी जिल्ह्याच्या राजकाराणात प्रवेश करून आपली स्वतंत्र आशी ओळख निर्माण केली होती.लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सदैव सक्रीय असलेला नेता जिल्ह्याने गमावला आहे.
स्व.अरूण जगताप यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली !
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे कि, माजी विधान परिषद सदस्य, माझे सहकारी आ. संग्राम भैय्या जगताप यांचे वडील व आमचे मार्गदर्शक अरुण काका जगताप यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने राजकारण, समाजकारण, क्रीडा, सहकार आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले एक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
राज्यातील अनेक मान्यवर्तनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाची माहिती मिळताच शोक व्यक्त केला.