21/02/2026
राळेगण म्हसोबा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात

राळेगण म्हसोबा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात

अहिल्यानगर ः राळेगण माझे जन्मगाव नसले तरी मी माझी कर्मभूमी मानतो. शिक्षक असताना गावात नोकरी केली. गावाने प्रेम, आपुलकी आणि स्नेह दिला. आजचा कार्यक्रम भव्यदिव्य असा होत आहे. स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे शाळांच्या विकासासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक असल्याचे मत अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या लोकल फंडचे सहायक संचालक रमेश कासार यांनी व्यक्त केले. 

तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील श्रीराम विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, शिक्षक सन्मान सोहळा आणि आदरणीय पांडुरंग गोरे सरांचा अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत उत्साह, आपुलकी आणि भावनांनी भरलेला वातावरणात पार पडला. कासार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच दीपाली सुधीर भापकर, प्रमुख पाहुणे बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य प्रफुल्लचंद्र पवार, उपसरपंच कल्पना कुलांगे, ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग गोरे, मुख्याध्यापक विजय जाधव उपस्थित होते. 

oplus_136314880

पांडुरंग गोरे म्हणाले, की ग्रामस्थांनी मला खूप साथ दिली. या गौरवाने मी भारावून गेलो आहे. न भूतो, न भविष्यती असा कार्यक्रम पार पडत आहे. माझ्या पंचवीस वर्षात गावकऱ्याचे, विद्यार्थ्यांचे खूप प्रेम मिळाले. त्यामुळेच मी प्रामाणिकपणे काम करू शकलो.  

सुरुवातीला सर्व माजी शिक्षकांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. स्वर्गीय शिक्षक, स्व. माजी विद्यार्थी आणि स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणीच्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यालयातील सध्याचे व सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विशेष आकर्षण ठरला पांडुरंग गोरे सरांचा अभिष्टचिंतन सोहळा. गेल्या २५ वर्षांपासून गणित विषयाच्या अध्यापनातून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे शिक्षकवर्ग, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी यांनी मोठे परिश्रम घेतले. जुन्या आठवणींना उजाळा देणारा, शिक्षकांविषयी कृतज्ञतेचा आणि स्नेहबंधन दृढ करणारा असा हा कार्यक्रम “न भूतो, न भविष्यती” ठरला. उध्दव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. 

२१०० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती 

श्रीराम विद्यालयाची स्थापना १९६६ साली झाली. या वर्षापासून ते आतापर्यतच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावली. आतापर्यच्या बॅचचे तब्बल २१०० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली.

आयएएस विजय कुलांगे बसले विद्यार्थ्यांत

गावाचे सुपुत्र तसेच माजी विद्यार्थी आयएएस विजय कुलांगे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत माजी विद्यार्थ्यांत बसणे पसंत केले. मनोगतामध्ये त्यांनी शाळेच्या विकासासाठी मार्गदर्शन केले. शाळेसाठी १ लाख रुपयांची मदतही त्यांनी तत्काळ जाहीर केली. सध्या ते ओडिशा राज्याच्या दुग्धविकास, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त आहेत. 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed