कांदा, दूध दरासाठी बैलगाडीतून खा. लंके यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

कांदा, दूध दरासाठी बैलगाडीतून खा. लंके यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. बैलगाडीसह गाई आणि म्हशी घेऊन महानगर पालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी निलेश लंके यांनी बैलगाडीतून आंदोलन करत गळ्यात कांद्याच्या माळा परिधान केल्या होत्या. यावेळी राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनामध्ये शिवसेना उबाठाचे विक्रम राठोड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेनेचे संदेश कार्ले, माजी महापौर फुलसौंदर, सीताराम काकडे आदी उपस्थित होते. सुमारे पाच तासापासून हे आंदोलन सुरु आहे. मात्र आंदोलनाची जिल्हाधिकारी किंवा प्रशासनाच्या कोणत्याच अधिकारी यांच्याकडून घेतली गेली नाही. प्रशासनाने निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाखाली यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच गेट तोडून आत जाऊ, असा इशारा निलेश लंके यांनी दिला आहे. दरम्यान सरकार आम्हाला 5 रुपये अनुदान देऊन भीक देत असून आम्हाला भीक नको हक्काचं द्या, अशी मागणी लंके यांनी केली असून लंके यांचं आंदोलन सुरूच आहे.
आंदोलनादरम्यान आंदोलकांनी बैलगाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाकडून बैलगाडी अडवण्यात आली. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास नकार दिल्याने आंदोलकांनी बैलगाडी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच सोडली. तर यावेळी निलेश लंके यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटले. त्यावेळी काहीसा पोलीस प्रशासनाकडून विरोध करण्यात आला मात्र नंतर दूध वाटप करू दिले. अनेकांची भाषणे यावेळी झाली.

दरम्यान राजेंद्र फाळके म्हणाले कि, शेतकरी कर्जाने पिचला आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. पीक विमा वेळेवर आणि सर्वाना मिळत नाही. सरकार हे शेतकरी विरोधी आहे. दुधाला योग्य भाव नाही. कांद्याला भाव नाही. शेतकऱ्यांनी करायचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित करत सरकारच्या निर्णयाचे वाभाडे काढले.
विखे यांचा फक्त दिखावा… दूध दरवाढ द्या : निलेश लंके
राज्य सरकारने म्हणजेच पशु व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना ३० रुपये दुधाला भाव आणि ५ रुपये अनुदान दिले आहे. ते तुटपुंजे आहे. आम्हाला आमच्या हक्काचे ४० रुपये दर द्यावा. र्याज्याचे प्रश्न केंद्रातील गृहमंत्र्यांकडे मांडून सुटणार नाहीत हा राज्याचा प्रश्न आहे तो राज्य सरकारने सोडावा. जिल्हाधिकारी हे मंत्र्यांचे ऐकतात, आंदोलनाचा धसका घेत संचारबंदी केली. मात्र हे किती दिवस चालणार. शेतकऱ्यांना दूध दरवाढ आणि कांद्याला भाव द्यावा, अन्यथा इथेच कार्यालयासमोर आंदोलन सुरूच राहील, नाहीतर राजधानीत लाखो शेतकऱ्यांसह आंदोलन करू, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला.