mns and shivsena alliance :मनसे-शिवसेना युती…? ठाकरेंची ठाकरेंना टाळी; राजकीय माइंडगेम काय…

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मनोमिलन होऊन एकत्र येणार असल्याची चर्चा
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मनोमिलन होऊन एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राज्यात जोरात सुरु आहे. या दोन्ही नेत्यांनी अलीकडेच महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. यातच आता महाराष्ट्र सरकार हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हि चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. त्यामुळे जात्याच्या राजकारणात कही ख़ुशी कही गंम अशी झाल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेत्यांनी युतीचे स्वागत केले आहे, तर काहींनी शंका व्यक्त केली आहे, त्यामुळे राजकीय वातावरण गुंतागुंतीचे झाले आहे. परंतु सध्या दोन्ही ठाकरेंच्या सेना किंवा पक्ष त्यांच्या युतीची चर्चाच सुरु आहे. मात्र त्यावर ठोस असा निर्णय किंवा शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र महाराष्ट्र, मराठी माणूस आणि भाषा या मुद्यांच्या आधारे युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मनसे आणि शिवसेना UBT हे दोन्ही पक्ष आणि दोन्ही चुलत बंधू जर एकत्र आले, तर नक्कीच राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगर पालिका यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. जायचा फायदा मनसे आणि शिवसेना UBT पक्षाला होऊ शकतो. कारण सध्याचे राजकारण ते केंद्रातील असो कि राज्यातील ते सारखे फिरताना दिसत आहे. कोटा पक्ष कुठे आणि कोणता नेता कुठे हे कळायला मार्ग नाही. परंतु समविचारी पक्षांनी एकत्र येऊन काम करावे अशी जनतेची भावना आहे. या युतीचा फायदा हा दोन्ही पक्षांना होईलच तो तसाच महाविकास आघाडीला देखील होईल. त्याची यामुळे ताकद वाढणार आहे.
भाजप आणि शिवसेना UBT पक्षात राजकीयदृष्ट्या सध्या विस्तवही जाताना दिसत नाही. कारण भाजपने सेना, पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता देखील गेली. मुंबई महानगरपालिकेसाठी हि युती फार महत्वाची मानली जात आहे.
दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या मुलाखतीमध्ये म्हटले होते कि, “उद्धव आणि माझ्यातील भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे अवघड नाही, फक्त इच्छाशक्तीची गरज आहे.”
उद्धव ठाकरे यांनीही भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात म्हटले कि, “मी किरकोळ वाद विसरायला तयार आहे. सर्व मराठी माणसांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे, पण जे महाराष्ट्राच्या विरोधात काम करतात, त्यांच्यासोबत सहकार्य नको.” म्हणजेच राज ठाकरे यांनी भाजप आणि मित्र पक्ष किंवा वोरोधकांना सहकार्य करू नये तरच खऱ्या अर्थाने हि युती होऊ शकते असं ठाकरे याना सुचवायचे असेल.
तर महाराष्ट्र सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले होते कि, “हिंदी भाषेचा आम्हाला विरोध नाही, पण ती जबरदस्तीने लादणे आम्ही सहन करणार नाही. मराठी ही पहिली भाषा असली पाहिजे.” तर राज ठाकरे यांनीही यावर टीका करत, “हा निर्णय मराठी संस्कृती आणि भाषेला कमकुवत करणारा आहे,” असे म्हटले होते.
राजकीय नेत्यांनी देखील ठाकरे यांच्या युतीबद्दल आपलीप्रतिक्रिया दिली आहे, त्या जाणून घेऊयात…..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे कि, कुणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यात काही वाईट नाही. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. पण या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. घाई करू नका, थोडी वाट पाहा. ते दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचे स्वागत करतो, तसेच ऑफर देणारे एक आणि त्याला प्रतिसाद देणारे दुसरे. त्यामुळे मी यावर जास्त काही बोलू शकत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याला पाठिंबा दर्शवला आणि म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या हितासाठी हे स्वागतार्ह आहे.” मात्र, शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी युतीची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. सोशल मिडीयावर तर काहींनी या युतीचे स्वागत केले आहे. तर काहींनी शंका उपस्थित केल्याचे पाहायला मिळत आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे हे चुलत बंधू आहेत आणि दोघेही एकेकाळी शिवसेनेत एकत्र होते. २००५ मध्ये राज ठाकरे यांनी पक्ष सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्थापन केली. त्यानंतर मात्र दोघांचे पक्ष वेगळे,कार्यकर्ते वेगळे, ध्येय – धोरणे वेगळे झाले होते. अनेक निवडणूक आल्या आणि गेल्या. मात्र यामध्ये राज ठाकरे याची भूमिका हि काहीप्रमाणात बदलताना दिसली. त्यामुळे युती होईल का? जर युती झाली तर ती फक्त मुंबई महानगर पालिकापुरतीच होईल कि यापुढे सर्व निवडणूक एकत्र लढल्या जातील हे येणाऱ्या काळातच समजेल. परंतु ही संभाव्य युती मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणित बदलू शकते.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी अट ठेवली आहे की, राज ठाकरे यांनी भाजपसारख्या महाराष्ट्रविरोधी शक्तींशी संबंध तोडावेत, जे राज यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते, कारण त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता.
सध्या युतीबाबत केवळ भावनिक आणि वरवरच्या चर्चा सुरू आहे आहेत, याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, परंतु येणाऱ्या निवडणूक आणि मराठी अस्मिता तसेच भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांची एकसमान भूमिका युतीच्या शक्यतेला बळ देणारी आहे.
दरम्यान राज ठाकरे यांचे मामा चंदुमामा यांनी या संभाव्य युतीबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे कि, “मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्य ऐकली, मला आनंदाची बातमी मिळाली, मी समाधानी आहे. आता हे दोघे एकत्र आले तर लेट बेटर दैन नेवर. काय गेले ते गेले, जर त्यांचे मन एकत्र आले तर चांगले होईल.”