हवामान विभागाचा येलो अलर्ट ; राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

हवामान विभागाचा येलो अलर्ट ; राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
MAHARASHTRA RAIN NEWS – हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्याच्या अनेक भागात तापमान वाढलेले पाहायला मिळाले, साधारणतः ३७ अंश सेल्सिअस ते ४३ अंश सेल्सिअस एवढे तापमानाची नोंद करण्यात अली आहे, तसेच राज्याच्या काही भागात तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील तापमानाचा पार ३७ अंश सेल्सिअस होता, जिल्ह्यात देखील काही भागात ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता आहे.
अवकाळी पावसाचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. गेल्या महिना भरापासून सुरू असलेल्या पावसामुळे फळबागांचं. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आजही हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, आणि लातूरमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान जरी राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत असला तरी देखील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट देखील असल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी रात्री तापमान वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही सोलापूर जिल्ह्यात झाली असून, सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. मुंबई आणि कोकणातील काही क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दमट हवामान असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.