आपचा केजरीवालांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध; १० मुद्द्याना प्रधान्य !

आपचा केजरीवालांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध; १० मुद्द्याना प्रधान्य
अरविंद केजरीवाल news -: दिल्लीतील कथित मद्य परवाना घोटाळ्याप्रकरणी तिहारच्या जेलमध्ये असलेले आप पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अंतरिम जामिनावर बाहेर आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी केजरीवाल आणि त्यांच्या टीमने जोरदार तयारी केली असून आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आम आदमी पक्षाच्यावतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला.
2024 च्या या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही आपच्यावतीने 10 हमींची घोषणा करणार आहोत. माझ्या अटकेमुळे उशीर झाला, पण निवडणुकीचे अनेक टप्पे बाकी आहेत. इंडिया आघाडीतील कोणालाही अडचण होणार नाही, अशी ही आश्वासने आहेत. या आश्वासनासंदर्भात मी इंडिया आघाडीतील कोणाशीही चर्चा केलेली नाही, पण इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर मी दिलेली आश्वासने पूर्ण करेल, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी आपला विविधांगी जाहीरनामा प्रसिद्ध केला.
आप पक्षाने जाहीर केलेले १० मुद्दे
देशात 24 तास विजेची तरतूद करणार आणि गरिबांना मोफत वीज देणार, प्रत्येक गावात चांगल्या शाळा बनवणार असून या माध्यमातून देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला चांगले आणि मोफत शिक्षण मिळण्याची व्यवस्था करणार, प्रत्येक गावात आणि गल्लीत मोहल्ला क्लिनीक उघडणार, प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार, राष्ट्र सर्वप्रथम या माध्यमातून लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देणार आणि चीनच्या ताब्यात गेलेली जमीन सोडवणार, अग्निवीर योजना लष्करासाठी घातक असून ही योजना बंद करणार, तसेच अग्निवीर योजनेद्वारे भरती झालेल्यांना पक्की नोकरी देणार, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला हमीभाव देणार, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार, एका वर्षात दोन कोटी रोजगार देण्याची व्यवस्था करणार, भाजपाच्या वाशिंग मशीनला भर चौकात फोडणार आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करणार, व्यापाऱ्यांसाठी जीएसटी प्रणाली अधिक सुकर करणार