आयुक्त जावळे यांच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई !

आयुक्त जावळे यांच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई !
अहमदनगर (प्रतिनिधी) – छत्रपती संभाजीनगर (एसीबी) लाचलुचपत विभागाच्या जालना येथील पथकाने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्यावर कारवाई केली आहे. बांधकाम व्यावसायिकास बांधकाम परवानगी देण्यासाठी आयुक्त जावळे यांनी सुमारे ८ लाखांची लाच मागितली होती. जावळे यांनी आपल्या कार्यालयातील (लिपिक) स्वीय सहायक देशपांडे नावाच्या व्यक्तीच्या मार्फत ही लाचेची मागणी केली होती. परंतु, संबंधित व्यक्तीला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयात तक्रार दिली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर या प्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अहमदनगर मधील नालेगाव येथे एका कंपनीला कन्स्ट्रक्शन फर्मचे बांधकाम करायचे असल्याने त्यांनी महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र या परवानगीसाठी मनपा आयुक्त जावळे यांनी आपल्या लिपिकामार्फत लाचेची मागणी केली होती. तर लाच देण्याचं ठरल्यावर परवानगी देण्यासाठी संमती दर्शवली. मात्र संबंधित कंपनीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीच्या जालना युनिटकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची खात्री केली. त्यानंतर १९ आणि २० जून रोजी ही लाच मागण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने या प्रकरणाची खात्री केली.
दरम्यान जावळे यांनी लाच मागितल्याचे खात्री झाल्यावर लाचलुचपत पथकाने कारवाईसाठी आज (गुरुवार, 27 जून) सापळा रचला होता. पण या कारवाईची कुणकुण लागतातच आयुक्त जावळे आणि त्यांचा लिपिक देशपांडे दोघेही महानगरपालिकेत फिरकलेच नाही. याप्रकरणी आता पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
अहमदनगर मनपा आयुक्तांनीच लाच मागितल्याचा आरोप झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान एसीबीच्या पथकाने आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी छापा टाकत तपासणी देखील केल्याची माहिती मिळत आहे. सोबतच दुसरा संशयित आरोपी देशपांडेच्या घरी देखील छापा टाकत चौकशी केली जात आहे. याप्रकरणामुळे जावळे यापूर्वी देखील अनेकांकडून लाच मागितली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.