राज्यात ८३८ तर नगर जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्यात ८३८ तर नगर जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
महाराष्ट्र राज्यात शेतकरी आत्महत्या या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. आता पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र सर्वच पक्ष आणि नेते हे पळवापळवी आणि जिरवाजिरवित व्यस्त आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळच नाही, असे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. राज्यात शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज माफी करावी अशी मागणी सध्या सुरु आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ अशा ४ महिन्यांत सुमारे ८३८ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याचे या ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. अहमदनगर मध्ये सुमारे १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र अनेक आत्महत्या केलेल्यात शेतकऱ्यांच्या वारसांना अद्याप प्रशासन किंवा सरकार स्तरावरून कसलीही आर्थिक मदत केली गेलेली नाही.
दरम्यान राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यात शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत राज्यात ८३८ शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत. फेब्रुवारीत २०८, मार्चमध्ये २१५ आणि एप्रिलमध्ये १८० आत्महत्या झाल्याची नोंद समोर आली आहे. या चार महिन्यांत दररोज सरासरी ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी
दुष्काळ परिस्थिती असलेल्या राज्यातील या चार महिन्यांत अमरावतीमध्ये ११६, यवतमाळमध्ये १०८, वाशिममध्ये ७७, जळगावमध्ये ६२, बीडमध्ये ५९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४, धाराशिवमध्ये ४२, वर्धामध्ये ३९, नांदेडमध्ये ४१, बुलढाण्यात १८, धुळ्यामध्ये १६, तर अहमदनगरमध्ये १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
राज्यात ज्या ८३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यापैकी सुमारे १७१ शेतकरी आत्महत्या प्रकरणे वैध ठरवण्यात आली आहेत. अद्यापपर्यंत १०४ शेतकऱ्यांना १ लाख आर्थिक मदत सरकारकडून देण्यात अली आहे. तर ६२ शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. त्याचबरोबर ६०५ शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे आता आर्थिक मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत कुटुंबीय आहेत.