‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अटी शिथिल, ३१ आगस्टपर्यंत मुदत वाढ

1
mukhyamantri mazi ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत बदल; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय !

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. लाभार्थी महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आली. तसेच नियम आणि अटींमध्ये शिथिल करण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून करण्यांत आली.

या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना सहज-सुलभपणे मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटी शिथील करण्यात आल्या आहेत. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा रु. १५०० /- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर, त्या ऐवजी १५ वर्षांपूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता सदर योजनेत लाभार्थी महिलांचं वयोगट २१ ते ६० वर्ष ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे. त्यामुळे याचा लाभ अनेकांना मिळणार आहे.

दरम्यान परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर, अशा बाबतीत त्यांच्या पतीचा १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. रुपये अडीच लाखांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर, ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

विधानभवन समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

About The Author

1 thought on “‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अटी शिथिल, ३१ आगस्टपर्यंत मुदत वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.