mahant ramgiri maharaj : महंत रामगिरी महाराजांविरोधात नगरसह सात ठिकाणी गुन्हे दाखल ; सुरक्षेत वाढ !
अहमदनगर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर परिसरातील सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (mahant ramgiri maharaj) यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकमधील येवल्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात, अहमदनगरमधील तोफखाना आणि संगमनेर, राहता, सोलापूर, पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता नालासोपारा पोलीस ठाण्यातही रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आता सरकार तसेच पोलीस प्रशासनाकडून याविषयी काळजी घेतली जात असून महंत रामगिरी महाराज यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र विरोधक या प्रकरणाला जातीय रंग देऊन शांत असणाऱ्या राज्यात सरकारला दंगली घडवायच्यात का असा सवाल या निमित्ताने विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
हिंदू मुस्लिम एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अहमद युसूफ मेमन यांच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता (बी.एन.एस)2023 चे कलम 192, 196, 197, 209, 302, 353 (2), 356 (3), 356 (2) प्रमाणे महंत रामगिरी महाराज उर्फ श्री गंगागिरी महाराज यांच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान महंत रामगिरी महाराज यांनी आपण आपल्या वक्त्यव्यावर ठाम असून आपण चुकीचे काही बोललो नाही असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या एक आमदाराने या वक्तव्याचा निषेध केला आहे.