jay pawar : जय पवार यांची कर्जत-जामखेडमध्ये चाचपणी ; राजकीय चर्चाना उधाण !

jay pawar : जय पवार यांची कर्जत-जामखेडमध्ये चाचपणी ; राजकीय चर्चाना उधाण !
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आज दि. १८ ऑगस्ट रोजी अचानक कर्जत दौरा केला. यावेळी जय पवार यांनी कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांच्या कर्जत दौऱ्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. कारण काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी याविषयी राजकीय भाकीत केले होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्या मतदारसंघात जय पवार यांनी अचानक दौरा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू शकतात, असे सूचक विधान केले होते. त्यामुळे आता जय पवार हे कर्जत – जामखेड विधानसभा मतदार संघात आल्याने विविध राजकीय चर्चाना उधाण आले आहे. ते मतदारसंघाची चाचपणी करायला आले असल्याचे देखील म्हटले जात आहे.
भाजपचा पारंपरिक मतदार संघ
कर्जत – जामखेड हा मतदार संघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र अजित पवार यांची एण्ट्री झाली तर आमदार राम शिंदे यांचा मतदारसंघ हातचा जाईल. मात्र भाजप काय निर्णय घेणार हे येत्या काळात समजेल. असेही म्हटले जात आहे कि, आमदार रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी भाजप कोणताही निर्णय घेऊ शकते, असे देखील चर्चिले जात आहे.