महिलांना आर्थिक, सामाजिक सुरक्षा देणे हि सरकारची प्राथमिकता : मुख्यमंत्री शिंदे
यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यात महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज दि. २४ रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी महिलांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता देणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
यावेळी उपस्थित लाडक्या बहिणींनी मोबाईल मध्ये टॉर्च दाखवत आणि राख्या बांधून माझे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वागत केले. यावेळी या महिला भगिनींना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात आले तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, उमेदच्या महिला भगिनींना सन्मानित देखील करण्यात आले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून दोनच महिने होत आहेत. राज्यभरातून १ कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली असून त्यातील १ कोटी ७ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार जमा करण्यात आले असल्याचे अधोरेखित करत ज्या महिला बाकी आहेत त्यांच्याही खात्यावर लवकरच रक्कम जमा केली जाईल असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी स्पष्ट केले.
काही जण ही योजना यशस्वी होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते, त्यासाठी त्यांनी कोर्टातही दाद मागितली. मात्र काहीही झाले तरीही ही योजना बंद होणार नाही. उलट टप्प्याटप्प्याने हे पैसे वाढवण्यात येतील असेही श्री. शिंदे यांनी म्हटले.
बदलापूर घटनेवरून विरोधकांचे राजकारण
बदलापूर येथे घडलेली घटना दुर्दैवी होती. यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार कोर्टात मागणी करेल. मात्र त्यांचं राजकारण करून बंद पुकारण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला. मात्र कोर्टाने त्यांचा बंद बेकायदेशीर ठरवला. त्यांच्या बाजूने निर्णय दिला की, मग सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, निवडणूक आयोग चांगले आणि त्यांच्या भूमिकेच्या विरोधात निर्णय दिला तर हे त्यांनाही नावं ठेवायला मागे पुढे पाहत नाहीत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भावना गवळी, आमदार अशोक उईके, आमदार मदन येरावार, आमदार संदिप धुर्वे, आमदार नामदेव ससाणे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाडक्या बहिणी बहुसंख्येने उपस्थित होत्या.