MPSC : लोकसेवा आयोगातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लेटर बॉम्ब; राज्य सरकारवर गंभीर आरोप

लोकसेवा आयोगातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लेटर बॉम्ब; राज्य सरकारवर गंभीर आरोप
Maharashtra Public Service Commission : राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यावर आपले पद सोडण्यासाठी राजकीय दबाव सुरु असल्याची चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक पात्र लिहिले असून त्यातून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान राज्यांमध्ये पदभरती प्रक्रिया राबवणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकाऱ्यांनी लोकसेवा आयोगाच्या पत्र लिहिताना आयोगाच्या अधिकारात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे म्हटले आहे. लोकसेवा आयोगाच्या अखत्यारित येणाऱ्या कामांमध्ये मंत्रालयामधूनच हस्तक्षेप होत असून आयोगाचे कामकाज तेथून चालवले जात असल्याचा आरोप सुद्धा पत्रामधून करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित अधिकारी संघटना, महाराष्ट्र लोकसेवा आयोग कर्मचारी संघटनेने याबाबतचे पत्र आयोगाच्या अध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारच्या कार्यशैलीवर संशय व्यक्त करत टीका केली जात आहे.
तसेच आयोगातील सहसचिवांची एक पद प्रतिनियुक्तीने भरण्यास विरोध करण्यात आला होता. मात्र ती मागणी फेटाळून आणखी एक सहसचिवांची प्रतिनियुक्तीवर आयोगात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील या पत्रातून करण्यात आला आहे.
सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत आहे : पाटील
MPSC आयोगात सरकारचा वाढता हस्तक्षेप हा गंभीर प्रकार आहे,आयोगातील अधिकारी वैतागून गेले आहेत. मंत्रालयातून निर्णय लादले जातात, MPSC च्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते, असे गंभीर आरोप पत्र लिहून सरकारवर केले आहेत. MPSC ची स्वायत्तता धोक्यात म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ हे सरकार करत आहे. या गोष्टीचा आम्ही खेद व्यक्त करतो. MPSC ला पाठबळ देऊन तिची स्वायत्तता टिकवणे हि सरकारची जबाबदारी आहे, असे काँग्रेसचे सतेज पाटील यांनी आपल्या (ट्विटर) एक्सवर पोस्ट करून सरकारवर टीका केली आहे.