shirdi : शिर्डी विमानतळ एकात्मिक टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

शिर्डी विमानतळ एकात्मिक टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
विमानतळ आर्थिक प्रगतीचे मुख्य केंद्र : मंत्री विखे पाटील
शिर्डी (प्रतिनिधी) – विकासाचे उदिष्ठ साध्य करताना समाजातील प्रत्येक घटकांचे कल्याण हाच आमचा अजेंडा आहे. हरियाणाच्या जनतेने विकासाला साथ देवून समाज तोडणा-या कॉग्रेसी प्रवृत्तीला धडा शिकविला आहे. महाविकास आघाडी राज्याला कमजोर करीत असून, महायुती महाराष्ट्राला मजबुत करण्याचा संकल्प करुन पुढे जात आहे. हरिणाया तर आपण जिंकलेच आता महाराष्ट्रातही महायुतीचा मोठा विजय आपल्याला मिळवायचा आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
शिर्डी येथील अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपुजन दुरदृष्य प्रणालीव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. राज्यपाल सी.पी राधाकृष्णन्, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार आदि नेते या कार्यक्रमास उपस्थित होते. तर शिर्डी विमानतळावर संपन्न झालेल्या कार्यक्रमास महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, आ.आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी आधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीमुळे साईभक्तांना मोठ्या सुविधा मिळणार आहेत. शिर्डी नव्हे तर शेजारील इतर धार्मिक स्थळांनाही याचा लाभ होवून जिल्ह्यासह राज्याचे पर्यटन वाढेल. या विमानतळाचा शेतक-यांनाही कृषि माल विदेशात पाठविण्यासाठी उपयोग होवून कृषि मालाची निर्यात करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, विरासत आणि विकास हा दृष्टीकोन ठेवून शेतकरी, गरीब, मजुर, उद्योजक यांच्या कल्याणासाठी आम्ही काम करीत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यासह या विभागाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी या टर्मिनल इमारतीमुळे होणार आहे. केवळ शिर्डीच्या अध्यात्मिक नगरला नाही तर भविष्यात होणा-या औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीनेही हे विमानतळ आता आर्थिक प्रगतीचे मुख्य केंद्र ठरणार असल्याचे सांगून या विमानतळाला श्री.साईबाबा अंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने ओळखले जावे व त्याची कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी आपल्या भाषणात केली.