RATAN TATA : उद्योगमहर्षी रतन टाटा कालवश !

उद्योगमहर्षी रतन टाटा कालवश !
RATAN TATA – भारतीय उद्योगविश्वाचे महर्षि रतन टाटा (Ratan Tata) यांचं निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात रतन टाटांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांनी उद्योग विश्वात आपल्या अतुलनीय योगदानाचा अमूल्य ठसा उमटवला. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वाचा आधारवड हरपला आहे. परोपकारी स्वभाव, सामाजिक जाणीव यामुळे रतन टाटा हे सर्वच स्तरातील लोकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने देशाचा उद्योगरत्न हरवल्याचे मान्यवरांकडून म्हटले जातेय. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.
1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष राहिलेले रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जायचे. रतन टाटा हे केवळ चांगले उद्योगपतीच नव्हते, तर ते एक चांगले माणूसही होते. त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची ते खूप काळजी घ्यायचे. 2004 ची ही घटना. पुण्यातील टाटा मोटर्सचे एमडी प्रकाश एम तेलंग यांची अचानक तब्येत खालावली. त्यांना आधी पुण्यातल्या रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्यांना तातडीनं मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. रविवार असल्याने डॉक्टरांना एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करने शक्य नव्हते. याबाबत रतन टाटा यांना सांगितल्यावर त्यांनी कंपनीचे विमान स्वतः उडवण्यास होकार दिला. रतन टाटा यांच्याकडे पायलटचा परवाना होता. पण, त्याचवेळी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली आणि प्रकाश यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. दरम्यान, तब्बल 50 वर्ष टाटा मोटर्समध्ये काम केल्यानंतर प्रकाश 2012 मध्ये निवृत्त झाले.
अशा अनेक घटना, प्रसंग आहेत कि, त्यामाध्यमातून त्यांचे उदार कार्यकर्तृत्व… सामाजिक जाणीव, कार्य सांगता येईल. अंत्यदर्शनासाठी रतन टाटांचं पार्थिव एनसीपीए येथे दाखल झले असून येथे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
दूरदर्शी नेतृत्व हरपले : नरेंद्र मोदी
रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X (ट्विटर) वरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘ श्री रतन टाटा हे एक दूरदर्शी बिझनेस लीडर, दयाळू आणि विलक्षण माणूस होते. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना त्यांनी स्थिर नेतृत्व दिले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले, ‘असे त्यांनी नमूद केले.
… मदतीचा स्वभाव सदैव स्मरणात राहील : खा. शरद पवार
जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मानबिंदू हरपला : देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ उद्योगपती श्री रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे.
राज ठाकरेंकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली
रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी लिहिली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाहिली श्रद्धांजली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘भारताचे सुपुत्र, पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे. आपल्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला. देश संकटात असताना अनेक प्रसंगावर त्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.