लंकेच्या पोस्टरवर मुंडे, राजळेंचे फोटो ; भाजपाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार

पाथर्डी (प्रतिनिधी) – महायुतीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निलेश लंके यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढतीकडे संपूर्ण राज्याचेच लक्ष लागले आहे. याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे भाजपचे पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णुपंत अकोलकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान लंके यांनी आज दि. २८ एप्रिल रोजी शेवगांव येथे होणाऱ्या सभेसाठी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्टरवर भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे आणि माजी आ. स्व. राजीव राजळे यांचे फोटो टाकल्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांची येथे जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहेत.
भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे आणि स्व.राजीव राजळे यांचे फोटो पोस्टरवर झळकल्याने भाजपने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. भाजप नेत्यांचे फोटो वापरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा मविआकडून विशेषतः निलेश लंके यांच्याकडून प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. मविआच्या बॅनरवर भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे आणि भाजपच्या शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांचे पती स्व.राजीव राजळे यांच्या फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान या तक्रारीनंतर निलेश लंके यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही, कदाचित आज होणाऱ्या सभेत ते या सगळ्या प्रकरणावर बोलतील. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे किंवा आ. मोनिकाताई राजळे, डॉ. सुजय विखे यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.