harshvardhan sapkal

प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती

काँग्रेसने महाराष्ट्रात भाकरी फिरवत अखेर प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ (harshvardhan sapkal) या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रात काँग्रेसला (congress) नवी भरारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आमदार नाना पटोले यांच्या जागी ते आता प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. बड्या चेहऱ्यांना संधी न देता काँग्रेसने महाराष्ट्रात धक्कातंत्र अवलंबले आहे. प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री राहिलेले सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख, या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र यांच्या ऐवजी पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांची गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. सध्या ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्न असलेल्या राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकीय जीवनात ते सक्रीय झाले होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी.पी.एड पदवी घेतली आहे. शेतकरी कुटूंबातून आलेले सपकाळ हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये त्यांचे विशेष असे योगदान आहे.

तसेच 1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सपकाळ यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती. तसेच 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मतदारसंघात जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सद्यस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन म्हणून कार्यरत आहेत. तसेच यापूर्वी राष्ट्रीय सचिव, अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी सुध्दा पार पाडलेली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.

काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणून सुध्दा त्यांनी काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. अ.भा.काँ.कमिटी द्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडलेली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधानसभा निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.