पारनेरमध्ये महाविकास आघाडीत फूट ! औटी यांचा विखेंना पाठिंबा; लंकेची डोकेदुखी वाढणार

औटी यांचा विखेंना पाठिंबा; लंकेची डोकेदुखी वाढणार
अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात थेट लढत होणार आहे. या लढतीकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र लंकेंना स्वतःच्याच मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार विजय औटी यांनी डॉ विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.



शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी अद्यापपर्यंत कोणतीच भूमिका न घेता तटस्थ राहणेच पसंत केले होते. मात्र औटी यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. विजय औटी यांनी सुजय विखेंना पाठींबा दिल्याने महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे. साहजिकच पारनेर तालुक्यातील मतविभागणी होणार असून विखे यांना याचा मोठा फायदा होणार आहे, मात्र लंके त्यांच्यापुढील डोकेदुखी वाढणार आहे. कारण दोन्ही विजय औटी हे विखे याच्यासोबत गेले आहेत.
दरम्यान डॉ. सुजय विखे यांना पाठींबा देताना आम्ही दोन्ही उमेदवारांचे विचार, कामाची पद्धत आणि अनुभवाचा विचार केला आहे. विखे पाटील यांनी पाच वर्षे चांगलं काम केले आहे. विखेंना आणखी पाच वर्षे संधी मिळाली, तर ते यापेक्षाही चांगले काम करू शकतात. एक अनुभव समृद्ध खासदार या भागाला मिळू शकेल, असे विजय औटी यांनी म्हटले आहे.
पारनेरच्या जनतेचे शोषण : डॉ. विखे
पारनेर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचे गेल्या वर्षभरापासून शोषण झाले आहे. गोरगरीब जनता आणि नेत्यांना प्रशासनाचा वापर करून हिनवण्याचा प्रकार झाला आहे. 4 जून रोजी निकाल लागेल त्या दिवशी पारनेर तालुक्याचे मतदान पहा आणि तेच या माझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे असे डॉ. सुजय विखे यांनी औटी यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर म्हटले आहे.
विजय औटी यांची विधानसभेची वाट मोकळी
माजी आमदार औटीयांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने नक्कीच पारनेर तालुक्यातील विखे यांना मताधिक्य मिळणार आहे. मात्र या पाठिंब्याच्या बदल्यात येत्या विधानसभेला आपल्याला विखे कुटुंबाने मदत करावी, अशी अटकळ देखील यामागे असण्याची शक्यता आहे. अप्रत्यक्षरीत्या औटी यांनी विधानसभेची आपली वाट मोकळी करून घेतल्याचे दिसतेय.