पावणेपाच वर्षात काय केले! विखेंची लंके यांच्यावर टीका

पावणेपाच वर्षात काय केले! विखेंची लंके यांच्यावर टीका
५० वर्षात कोणालाच धमकावले नाही; ७ मे रोजी मोदी यांची सभा
अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर लोकसभा मतदार संघातील प्रचार शिगेला पोहचला असुन उन्हाचा पारा चढत आहे तसतसे राजकारण तापताना दिसत आहे. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. खा. सुजय विखे यांनी विरोधकांकडून प्रचारात वापरल्या जाणाऱ्या कांदा भाव, दुधाचे दर, बेरोजगारी, दूध, पाणी प्रश्न आदी मुद्द्यांवरून लंके यांचा नामोल्लेख टाळत विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला असून आपल्या काळात केलेल्या विविध विकास कामांचा पाढाच जनतेसमोर मांडला. त्यामुळे विरोधकांना चांगलीच चपराक बसणार आहे असेच दिसतेय.
शहरातील मतदारांच्या संवाद बैठकीदरम्यान डॉ विखे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कांदा प्रश्नावर तुम्ही आमच्यावर आरोप करता, अहो पावणे पाच वर्षापासून तुम्ही देखील सत्ताधारी आमदार होतातच की, काय केलं कांद्याच्या प्रश्नावर? का नाही लढले तुम्ही? का तुम्ही आज फक्त लोकसभेच्या तिकिटासाठी राजीनामा देताय. कांद्याला भाव मिळाला नाही, म्हणून मी राजीनामा देतो, असं जर तुम्ही म्हटलं असतं तर तुमचा आम्ही सत्कार केला असता. हा राजीनामा तुम्ही तीन वर्षाअगोदर का नाही दिला? दुधाच्या प्रश्नावर राजीनामा का नाही दिला? हे फक्त आणि फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी चित्र रंगवलं जातं आहे, असा आरोप देखील विखे यांनी केला.
५० वर्षांचं राजकारण मात्र कोणाला धमकावले नाही
दरम्यान ५० वर्षे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये तुम्ही सत्ता देण्याचं काम केलं. या ५० वर्षांमध्ये केंद्रीय मंत्रीपद मिळालं, राज्यमंत्री पद मिळालं, जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद मिळालं, खासदारकी मिळाली; पण आम्ही ५० वर्षांमध्ये कोणालाही धमकावलं नाही. याचा अभिमान आम्हाला आहे असे सुजय विखे यांनी यावेळी सांगितले.
३ नंबर म्हणजे पांडुरंगाने घडवून आणलेला योग
आम्ही या जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण टिकवण्यासाठी लढतोय आणि जर हेच सुसंस्कृत राजकारण तुम्हाला हवं असेल, तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण मला १३ में ला ०३ नंबरचे बटण दाबून विजयी करा. विशेष म्हणजे ०३ नंबरचे बटण पांडुरंगाने दिलं आहे, कारण नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल म्हणून आपण ३ नंबरचे बटण दाबावं ही विनंती, असे उद्गार देखील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले.
मोदी यांची ७ मे रोजी सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ मे रोजी नगर मध्ये डॉ. विखे त्यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठिकठिकाणी संवाद सभा घेण्याचा सपाटाच लावला आहे.