कोपर्डी येथील घटना : नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या

कोपर्डी येथील घटना : नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या
Ahmednagar (प्रतिनिधी) – तालुक्यातील कोपर्डी येथे विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्यामुळे एका दलित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दि, २ मे रोजी कोपर्डी येथे घडली. या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोपर्डी घटनेतील पीडित मुलीचा भाऊ या आरोपीच्या यादीमध्ये नाव सामील आहे असे समजतेय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपर्डी येथे भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने बुधवारी रात्री तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावाजवळच हरणवस्ती येथे राहणारा तरुण विठ्ठल उर्फ नितीन कांतीलाल शिंदे हा तमाशा सुरू असताना व्यासपीठाजवळ नाचत होता. त्यास हरकत घेऊन काही जणांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे तमाशात गोंधळ उडाला. काही जणांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. परंतु गोंधळामुळे तमाशा बंद पडला. त्यानंतर शिंदे घरी जात असताना त्याला विवस्त्र करत मारहाण झाली. त्याचा मोबाइलही काढून घेतला. सकाळी त्याने घरी निरोप पाठवला. त्याचे नातलग कपडे घेऊन आले व त्याला घरी नेले. त्यानंतर गुरुवारी दुपारी नितीनने घरातच आत्महत्या केली.
दरम्यान नितीन शिंदे याच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीत गावातील काही जणांची नावे लिहिली आहेत. त्याआधारे तपस करून पुढील कारवाई केली जाईल असे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी सांगितले. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात मृत तरुणाच्या वडिलांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.