मुंगीत नऊ लाखाचा गांजा जप्त; आरोपी ताब्यात : शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई

मुंगीत नऊ लाखाचा गांजा जप्त; आरोपी ताब्यात : शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई
दादासाहेब डोंगरे
शेवगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील मुंगी गावाच्या शिवारात शेवगाव पोलीसांनी कारवाई करुन १७९ किलो वजनाची, सुमारे नऊ लाख रुपये किंमतीची, ९४ गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी मुकुंद विनायक होळकर (रा.मुंगी ता. शेवगाव) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी कि, सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी कोंबींग ऑपरेशन राबविण्यासंदर्भात, पथकाची स्थापना करुन, अंमली पदार्थ, अवैध धंदे, अग्निशस्त्रे व हत्यारे याबाबत मोहीम राबवावी, असे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत. दरम्यान पथके कारवाईसाठी रवाना केली असताना, पोलीस निरीक्षकांना आपल्या गुप्तहेरामार्फत मुंगी गावच्या शिवारात गांजाची झाडे असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी हि मोठी कारवाई केली आहे.
दरम्यान पोलिसांच्या पथकाने मुकुंद विनायक होळकर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गट नंबर ८५ मध्ये शेतात गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे सांगितले. संबंधित स्थळी शासकीय पंचांच्यासह पथक गेले असता, १७९ किलो २४ ग्रॅम वजनाची, एकुण ९४ लहान मोठी, ८ लाख ९६ हजार २०० रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळून आली. पोलिसांनी ती झाडे जागेवर जप्त केली आहेत.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, सहायक फौजदार राजु ससाणे, पोलीस कर्मचारी, परशुराम नाकाडे, किशोर काळे, उमेश गायकवाड, संदिप आव्हाड, शाम गुंजाळ, बाप्पासाहेब धाकतोडे, अमोल ढाळे, एकनाथ गर्कळ, संतोष वाघ, यांनी केली आहे.पोलिसांच्या या कारवाईचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
शेवगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारे अवैधरित्या वाळू उपसा, दारू विक्री केली जात आहे, याबाबत नागरिकांतून अनेकवेळा प्रश्न उपस्थित केले जात आहेत, याकडे देखील पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.