देशात मोदींना पर्याय नाही : ना. मुंडे

देशात मोदींना पर्याय नाही : ना. मुंडे
शेवगाव (प्रतिनिधी) – उभा देश म्हणतोय की देशाला मोदींशिवाय पर्याय नाही. खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या १० प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील महायुतीच्या प्रचार सभेत मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, दत्ताभाऊ पानसरे, नंदू मुंडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, एकनाथ खटाळ, काकासाहेब ननावरे, राहुल देशमुख आदी उपस्थित होते.
ना. मुंडे म्हणाले की, २०१४ मध्ये देश दिवाळखोरीत निघाला असताना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत १० वर्षात इतके काम केले की, देशाची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर आणुन ठेवली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगात देशाची इतकी पत आणि प्रतिष्ठा वाढली आहे की, आपल्या देशाबद्दल जर इतर देशातील मंत्रीमडळातील एखाद्या नेत्याने ब्र जरी काढला तरी त्या देशाचा पंतप्रधान त्या नेत्याचा राजीनामा घेतो. आज ही ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. यामुळे जर देश सुरक्षित आणि विकसित ठेवायचा असेल तर मोदींशिवाय देशाला कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
… तर तुमचा बाप देखील काढला जाणार
पोलिसांचा बाप काढतो तो उद्या निवडून आल्यावर तुमचा बाप काढायला सुद्धा कमी करणार नाही. पारनेर तालुक्याने जी चुक केली ती चुक आता तुम्ही करू नका असे आवाहन मुंडे यांनी जनतेला केले.
डॉ. विखेंच्या माध्यमातून नगरचा विकास होईल
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली खा. विखेंच्या माध्यमातून नगर जिल्हा देशातील सर्वात विकसित जिल्हा म्हणून नावारुपाला येईल अशी खात्री देत येता १३ मे रोजी डॉ विखे याना निवडून देण्याचे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.