शिवसेनेचे जाधव – वर्चस्व ग्रुपचे मुर्तडक गटात राडा; स्कॉर्पिओ – कार्यालयाची तोडफोड

नेवासा येथे एका पुरुषाचा खून, शरीराचे केले तुकडे; गुन्हा दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात एकूण ११ जागांवर चौथ्या टप्प्याचे मतदान उद्या दि.१३ मे रोजी (सोमवारी) पार पडणार आहे. यासाठी सगळ्याच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. त्यासाठी जिल्हाधीकारी शालीमठ यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत मात्र, अहमदनगरमध्ये मतदानाच्या काही तास आधीच दोन गटांत राडा झाला आहे. शहरातील मंगल गेट परिसरात दोन गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत.
माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांचे कार्यकर्ते आणि वर्चस्व ग्रुपचे सागर मुर्तडक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादातून तुफान दगडफेक आणि काहीअंशी मारामारी झाली आहे. या दगडफेकीमध्ये एक स्कॉर्पिओ आणि सागर मुर्तडक यांचं कार्यालय फोडण्यात आलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या दगडफेकीनंतर मंगल गेट परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये सचिन जाधव हे जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असाच सरळ सामना रंगणार आहे. भाजपकडून तत्कालिन खासदार सुजय विखे पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
नगरच्या या जागेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी प्रचारादरम्यान झडल्या होत्या, प्रचाराच्या तोफा देखील थंड झाल्या आहेत, मात्र अशाप्रकारे वाद होत असल्याने प्रशासनाच्या नोयोजनावर बोट ठेवले जात आहे, दरम्यान या सर्व कारणांमुळे नगरच्या निवडणुकीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. या वादाला राजकीय किनार असण्याची शक्यता आहे.
जखमी जाधव यांची लंके यांनी घेतली भेट
दोन गटात झालेल्या रंध्यामध्ये जखमी झालेले माजी नगरसेवक सचिन जाधव यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यावेळी घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे (sp) उमेदवार निलेश लंके यांनी भेट घेऊन विचारपूस केली, ते म्हणाले कि, मतदानापूर्वीच अशापद्धतीने घटना घडत आहेत, शहरात नेमके कोण गुंडगिरी करत आहे हे जनतेने लक्षात घ्यावे, दोन्ही गटातील कार्यकर्ते हे माझ्याविरोधात प्रचार करत होते मात्र माणुसकी म्हणून आपण भेटण्यासाठी आलो आहोत, हा एक परिवाराचं आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे.
दोन्ही गटात डॉ. सुजय विखे यांचे कार्यकर्ते
माजी नगरसेवक सचिन जाधव आणि वर्चस्व ग्रुपचे सागर मुर्तडक हे दोघेही भाजपचे खा, डॉ. सुजय विखे यांचे कार्यकर्ते आहेत, दोघेही विखे याचा प्रचार करत होते, दोन्ही गटातील हा वाद नेमका कोणत्या कारणास्तव झाला हे अद्यापही समोर आलेले नाही, त्यामुळे विखे नेमके काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेले आहे.