नाशिक-दिंडोरीत सकल मराठा समाजाचा आघाडीला पाठिंबा

नाशिक-दिंडोरीत सकल मराठा समाजाचा आघाडीला पाठिंबा
नाशिक – राज्यातील ५ व्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे, याआधीच सकल मराठा समाजाने महायुतीला मोठा धक्का देत नाशिक आणि दिंडोरीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिकमधील मराठा मतदारांचं प्रमाण 70 टक्के आहे. महायुतीचे हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे दोघेही मराठा समाजातून येतात. त्यामुळे आता सकल मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेचा थेट फायदा राजाभाऊ वाजेंना होऊ शकतो. राखीव मतदारसंघ असलेल्या दिंडोरीमध्ये मराठा मतदार 35 ते 40 टक्के आहेत. त्यामुळे याठिकाणीही मराठा समाजाची मतं निर्णायक ठरू शकतात. मराठा समाजाच्या सर्व मतदारांनी महाविकास आघाडीच्या भास्कर भगरेंना मत दिल्यास महायुतीच्या भारती पवार यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र या जागेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार चुरस रंगली होती. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दावा केला की, अमित शहांनी त्यांना या जागेवर निवडणूक लढण्यास सांगितले आहे. मात्र भुजबळांना उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली. जवळपास महिनाभर सुरू असलेला वाद आता सुटला असला तरी सकल मराठा समाजाने नाशिक आणि दिंडोरी येथे आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे विरोधी उमेदवारांना निवडून येण्यासाठी कसरत करावी लागणार असेच दिसतेय.
जरांगे यांची कोणतीही प्रतिक्रिया नाही
दरम्यान सकल मराठा समाजाने आपली येथील भूमिका जाहीर केली असली तरी अद्याप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्याकडून अद्याप कोणत्याहीप्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.