राज्यात चारा टंचाईचे संकट; शासनाची तयारी पूर्ण : ना. विखे पाटील

पारनेर, श्रीगोंदा, कर्जतला कुकडीचे आवर्तन; शेतकऱ्यांना होणार फायदा : पालकमंत्री विखे पाटील
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. तसेच मान्सून लांबला तर चारा टंचाईचे देखील संकट उभे राहणार आहे. दरम्यान, राज्यात आताच्या घडीला सुमारे २ महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे, येत्या काळात चारा प्रश्न निर्माण झाला तर आवश्यक त्या ठिकाणी चारा डेपो किंवा छावण्या सुरू करण्याची शासनाची तयारी असल्याची माहिती महसुल तथा दुग्ध आणि पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना दिली.
ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “येणाऱ्या काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होईल हा विचार करूनच आपण ऍडव्हान्स प्लॅनिंग केले आहे. दोन महिने पुरेल इतका चारा राज्यात उपलब्ध आहे. याबाबत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी चारा टंचाई निर्माण होईल त्या ठिकाणी चारा डेपो सुरु करू, मात्र सध्या याची आवश्यकता नाही, तसेच गरज भासली तर ज्या ठिकाणी पाणी आहे तेथील शेतकऱ्यांना शासनाकडून मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल असे दुग्ध आणि पशु संवर्धन मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.
पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार
अहमदनगर जिल्ह्यात नेहमीपेक्षा पावसाचे प्रमाण हे कमी आहे, त्यामुळे धरणं कमी भरतात, त्यातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. त्यातच पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे आता पश्चिम वहिनी नद्याचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणायची योजना आपण हाती घेतली आहे, याचा लाभ भविष्यात येथील शेतकऱ्यांना आणि जनतेला होईल अशीही माहीती विखे पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यात सध्याच्या घडीला पाण्याचे संकट उभे ठाकले असून अनेक गावांना आणि वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी सर्वोतोपरी शासनाकडून सहकार्य हे करण्यात येत आहे. सुमारे ५ ते ६ लाख लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.