अहमदनगर : मोदींचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी खा. संजय राऊत यांच्यावर गुन्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राऊतांना नोटीस
अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अहमदनगर मधील एका प्रचार सभेत औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला होता. मात्र या वक्तव्यामुळे खा. संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहमदनगर शहरातील क्लेराब्रूस मैदानावर 8 मे रोजी सायंकाळी सभा झाली होती. यावेळी खा. राऊत यांनी मोदी यांचा एकेरी उल्लेख करत म्हटले होते कि, आपल्याला इतिहासामध्ये जावे लागेल. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. तेथील माती औरंगजेबाची माती आहे. औरंगजेबाचा जन्म आणि नरेंद्र मोदी यांचा जन्म दावतमध्ये झाला आहे. औरंगजेब तिथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी औरंगजेबसारखे मोदी वागत आहेत. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडला आहे, तर तू कोण? असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेकडून राऊत यांच्यावर कारवाईबाबत कोतवाली पोलिसांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी याबाबत शुक्रवारी फिर्याद दिली आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने खा संजय राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम 171(क) 506 आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 123 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिकचा तपास कोतवाली पोलीस करत आहेत.