नेवासा येथे एका पुरुषाचा खून, शरीराचे केले तुकडे; गुन्हा दाखल

नेवासा येथे एका पुरुषाचा खून, शरीराचे केले तुकडे; गुन्हा दाखल
अहमदनगर – नेवासा तालुक्यातील देडगाव येथे एका पुरुषाचा खून करून शरीराचे तुकडे तुकडे करून मुळा कालव्याच्या पाटात टाकले असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या खुनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून उलटसुलट चर्चा केल्या जात आहेत.
या घटनेची अधिक माहिती अशी कि, देडगाव येथील पोलीस पाटील प्रल्हाद ससाणे यांना दि.१६ मे रोजी सरपंच चंद्रकांत भानुदास मुंगसे यांनी देडगावच्या हद्दीतील पाटात एका माणसाच्या पायाचा तुकडा पाण्यावर तरंगत असल्याची माहिती दिली, त्यानंतर पोलीस पाटील श्री. ससाणे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस नाईक किरण पवार यांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस नाईक किरण पवार हे घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांवेळी मांडीचा भाग असलेला कुजलेला मांसाचा तुकडा आढळून आला.
तसेच एका पिवळ्या रंगाच्या गोणीत अनोळखी मानवी कुजलेले पुरुष जातीचे मुंडके, धडाचा कुजलेला मांसाचा तुकडा, गुडघ्याचा कुजलेला मांसाचा तुकडा आढळून आला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून हा नेमका कोणाचा खून करण्यात आला? यावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
दरम्यान याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.