… तर बैलगाडा शर्यत, पशुधन खरेदी-विक्रीवर बंदी !

… तर बैलगाडा शर्यत, पशुधन खरेदी-विक्रीवर बंदी !
अहमदनगर – बैलगाडा शर्यत आणि पशूंची खरेदी-विक्री करताना आता काळजी घ्यावी लागणार आहे, नाहीतर बैलगाडा शर्यतीत भाग घेता येणार नाही आणि पशूंची खरेदी विक्री देखील करता येणार नाही, बैलगाडा शर्यतीसाठी कानाला बिल्ला (एअर टॅग) नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही. टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. ईअर टॅग नसल्यास पशुधनाची खरेदी विक्री ही करता येणार नाही. 1 जून पासून कानाला बिल्ला (एअर टॅग) असणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक शासनाने काढले आहे.
कानाला बिल्ला नसेल तर विक्रीवर बंदी
कानाला बिल्ला (इअर टॅग) हि एक बारकोड पद्धती आहे, त्याची नोंद केंद्र सरकारकडे संग्रहित केली जाते. बाजार समिती, आठवडी बाजार, खरेदी विक्री संघ, किंवा इतर ठिकाणी यांनी इतर पशुधनाची ही विक्री करताना हा इअर टॅग दिला आहे किंवा नाही हे पाहावे लागणार आहे. जर अशापद्धतीने कानाला बिल्ला नसेल तर अशा विक्रीवर बंदी घालावी, असा शासन आदेश काढण्यात आलेला आहे. तेव्हा बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यापूर्वी इअर टॅगिंग करूनच भाग घ्यावा तसेच पशूंची खरेदीविक्री करावी अन्यथा त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे हि काळजी घेणे गरजेचे आहे.
केंद्राकडून पशुधन प्रणाली
दरम्यान केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने ‘नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन‘ ही भारत पशुधन प्रणाली आणली आहे. या प्रणालीनुसार जनावराच्या कानाला एक टॅग लावण्यात येतो. त्यात एक 12 अंकी बारकोड असतो. यामध्ये पशुची जन्म आणि मृत्यूची नोंद असते. वेळोवेळी केलेले रोग प्रतिबंधात्मक लसीकरण आणि औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण याची नोंद याद्वारे ठेवण्यात येते.