शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : मान्सून अंदमानमध्ये दाखल; जिल्ह्यासह राज्यात पाऊस बरसणार

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : मान्सून अंदमानमध्ये दाखल; जिल्ह्यासह राज्यात पाऊस बरसणार
MONSOON 2024 – अहमदनगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर, पुणे, नाशिक, बीड आदी ठिकाणी आज पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे मागीलवर्षीपेक्षा अगोदरच मान्सूनचे आगमन होणार आहे, शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी असून शेतीची कामे करण्यासाठी यामुळे लगबग सुरु होणार आहे.
गेल्या 24 तासात अंदमान निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाला आहे. 31 मे रोजी मान्सून केरळात आणि जवळच्या राज्यात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच २६ मे दरम्यान राज्यातील कोल्हापूर सांगली सोलापूर बीड, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर अहमदनगर, पुणे, नाशिक, लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान तळकोकण, मुंबई, सिंधुदुर्ग या भागात पाऊस बरसणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.