“नगर”च्या दोघांचा मांडओहोळ धरणात बुडून मृत्यू

"नगर"च्या दोघांचा मांडओहोळ धरणात बुडून मृत्यू
अहमदनगर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नगर येथील दोन तरुण बुडाले. यामध्ये अथर्व श्रीनिवास श्रीराम, आणि सौरभ नरेश मच्छा (रा. शिवाजी नगर, अहमदनगर) यांचा मृत्यू झाला. १९ मे रोजी हि दुर्दैवी घटना घडली.
दरम्यान अथर्व आणि सौरभ हे शिवाजी नगर येथील गणपती कारखान्यात कमला होते, हे दोघेही मूर्ती बनवण्याचे काम करत होते. चैतन्य बालाजी सापा, आकाश अनिल हुंदाडे, अभिलाष रघुनाथ सुरम (तिघेही रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, नगर), जीवन दिनेश पाटील (रेल्वेस्टेशन, आगरकर मळा, नगर) तसेच मृत अथर्व श्रीराम व सौरभ मच्छा असे नगर येथील सहा तरुण पारनेर तालुक्यात फिरण्यासाठी आले होते. त्यांनी रांजणखळगे आणि त्यानंतर मळगंगा देवीचे दर्शन करून मांडओहोळ येथे मृत पाणीसाठा असलेल्या धरणात पोहण्यासाठी गेले आणि हि दुर्दैवी घटना घडली. यावेळी मित्रांनी आरडा ओरड केली त्यावेळी परिसरातील नागरिकांनी येथे येत सहकार्य केलं. प्रशासनाने देखील माहिती मिळताच घटनास्थळी येत नागरिकांच्या साहाय्याने दोघांचा शोध घेतला.दि. १९ मे रोजी सौरभ यांचा मृतदेह सापडला तर दि. २० मे रोजी अथर्व यांचा मृतदेह सकाळी सुमारे ९ वाजेच्या दरम्यान सापडला.
तसेच पोखरीचे सरपंच प्रकाश गाजरे यांच्यासह अजय वाघ व परिसरातील तरुणांनी मदतकार्यात भाग घेतला. पोलिसांच्या पथकाने देखील घटनास्थळी येत सर्व परिस्थितीची माहिती घेऊन याकामी आपले कर्तव्य बजावले. मृत नातेवाईक आणि नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.