१२ वर्षांनी जाग आली ; “अण्णा हजारे यांची पवारांवर” टीका

१२ वर्षांनी जाग आली ; "अण्णा हजारे यांची पवारांवर" टीका
अहमदनगर (प्रतिनिधी) – देशात लोकसभा निवडणूक पार पडलीय यामध्ये अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर केलेल्या टीकेला अण्णांनी उत्तर दिले असून ते म्हणाले की, “शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही. त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते. तसेच मी शरद पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील यांच्याविरोधातही आंदोलन केले होते. कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली”, असावी अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
तसेच अण्णांनी श्री. पवार यांचे सहकारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही टोला लगावला. आमदार आव्हाड यांनीही मध्यंतरी माझ्यावर टीका केली होती. मात्र, प्रत्येक पक्षात हे समविचारी माणसं असतात, ते आणि पवार हे एकाच पक्षात आहेत,असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
पवार यांनी काय टीका केली होती?
दरम्यान काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी.आर. खैरनार यांनी ‘माझ्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा केला होता. या आरोपांची चौकशीही झाली होती. मात्र, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पुराव्यांनीशी समोर आले होते. मात्र, ते दोघेही आता कुठे दिसत नाही, अशी टीका शरद पवार यांनी आण्णा हजारे यांच्यावर केली होती.