…सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा; अन्यथा विधानसभा लढवणार : जरांगे पाटील

...सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा; अन्यथा विधानसभा लढवणार : जरांगे पाटील
Manoj Jarange Patil – “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणाचाही प्रचार केला नाही किंवा कोणाला पाडाही म्हटलो नाही. ८ जून रोजी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण पुन्हा सुरु करणार आहे. त्यामुळे सरकारने सग्यासोयऱ्यांची अमलबजावणी करावी, समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवण्यावर आम्ही ठाम आहोत. मराठ्यांची खरी किंमत या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आली. मराठा आरक्षण मिळावं यासाठी आम्ही संघर्षाला तयार आहोत,” असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला. यामध्ये बऱ्याच दिग्गज नेत्यांना सत्तेवरून काढता पाया घ्यावा लागला आहे. यावर जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया वृत्त वहिनीला दिली, त्यात त्यांनी म्हटले आहे कि, “आम्ही जाहीररित्या कोणालाही पाडा म्हटलेलंच नाही. आम्ही तसं म्हटलो असतो तर माझी किंवा समाजाची प्रतिष्ठा पणाला लागली असती. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही कोणाला पाडायचं हे सांगण्यासाठी भूमिका घेणार आहोत”, असं जरांगे पाटील म्हणाले.
तसेच “माझ्या समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. गोरगरीब मराठ्यांना किंमत दिली जात नव्हती. विश्वासात घेतलं जात नव्हतं. मात्र, माझ्या गरीब मराठ्यांना या निवडणुकीत किंमत आली. मराठ्यांच्या एकजुटीची ताकद यावेळी दिसली. आम्हीदेखील ताकद दाखवू शकतो, हे सिद्ध केलं. मराठ्यांच्या शक्तीचं मतात परिवर्तन होत नाही, असं म्हटलं जात होतं. पण ते झालं, असंही जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान “काही गावकरी मला गाव सोडून जाऊ देत नाही. त्यामुळे मी अंतरवाली सराटी येथेच उपोषणाला बसणार आहे,” असेही जरंगे पाटील यांनी म्हटले आहे.