Maratha Reservation : मराठा आंदोलनावर जरांगे ठाम; उपोषणाला आजपासून सुरुवात, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात!

मराठा आंदोलनावर जरांगे ठाम; उपोषणाला आजपासून सुरुवात, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
matatha reservation – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम असून आज दि. ८ जून पासून सकाळी १० वाजतापासून हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. त्यांनी सरकारला प्रश्न उपस्थित करत आंतरवाली सराटी आणि शेजारील गावातील काही ग्रामस्थांनी माझ्या उपोषणासाठी गावात परवानगी देऊ नये, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे परवानगी नाकारली मात्र, यामागे सरकारचे षडयंत्र आहे. सरकारला गोरगरीब मराठा समाजाचे आंदोलन दडपायचे आहे. मी निवेदन देणाऱ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. गेल्या 10 महिन्यांमध्ये हे निवेदन का दिले नाही? निवेदनाच्या आधारावर माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारणार असाल तर उद्या मी मोदींनी शपथ घेऊ नये, असे निवदेन देऊ का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित करत साळकरलाच कोंडीत पकडले आहे.
आपण लोकसभा निवडणुकीचा विषय सोडून दिला आहे. आता शांतता आहे. निवडणुकीत हार-जीत होत असते. आंतरवालीच्या ग्रामस्थांनी दिलेलं निवेदन जाणीवपूर्वक आहे. मग उद्या तुमच्या यात्रा निघतील, तेव्हा आम्हीही निवेदन देऊ. यात्रेमुळे रस्त्यावर रहदारीला त्रास होतो, विद्यार्थ्यांना शाळेत जायचे आहे, यात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होईल, असे आम्हीही निवेदनात सांगू. मग पोलीस त्या यात्रा रद्द करणार का, असा सवालही जरांगे पाटील यांनी विचारला. मला परवानगी प्रशासनाने नाही तर सरकारने परवानगी नाकारली असल्याचे मनोज जरंगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान आंतरवाली सराटीत उपोषणस्थळी समाज बांधवांनी येऊ नये. सध्या पेरणीचे दिवस आहेत. या लढ्यासाठी मी खंबीर आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू न देण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक ,गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची आहे. याठिकाणी काही झालेच तर याला जबाबदार निवेदन देणारेच असतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आपण फक्त कायदा आणि घटनेला मानतो, कायदा चालवणाऱ्याला मानत नाही असे देखील जरंगे यांनी म्हटले आहे. आम्हाला घटनेने आणि जनतेने शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मी आता घटनेला मानायला लागलोय, कायदा चालवून घेणाऱ्याला मी मानत नाही. जो कायदा चालवायला मराठ्यांनी त्या पदावर बसवलाय, तो कायदा पायदळी तुडवायला लागला आहे, असे म्हणत जरंगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.
तसेच 4 तारखेला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता होती, मी आचारसंहितेचा सन्मान केला आहे. आता आज 8 ताराखेपासून उपोषण सुरु होत आहे. पण पुन्हा तुम्ही परवानगी नाकारली. तुम्ही वारंवार परवानगी नाकारणार असाल तर तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही, मी कायद्याला मानतो. मी घटनेला मानतो, मला कायद्याने अधिकार दिला आहे. मी सकाळी आमरण उपोषणाला बसणार आहे, मी मागे हटणार नाही, असे जरंगे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान उपोषणस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.