बाजार समितीत कांदा अनुदानात २ कोटींचा भ्रष्टाचार; सचिवासह 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

बाजार समितीत कांदा अनुदानात २ कोटींचा भ्रष्टाचार; सचिवासह 16 जणांविरोधात गुन्हा दाखल
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ रुपये इतक्या रकमेच्या कांदा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करुन आणि त्यासंबंधित निधीचा गैरव्यवहार (घोटाळा) करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी समितीचे सचिव आणि आडते व व्यापारी अशा एकूण १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आरोपींमध्ये सचिव दिलीप लक्ष्मण डेबरे (रा. वेळु, ता. श्रीगोंदा), आडते/व्यापारी हवालदार ट्रेडींग कंपनी व त्यांचे दिवाणजी, महादेव लोखंडे (रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा), सत्यम ट्रेडर्स, राज ट्रेडर्स, घनश्याम प्रकाश चव्हाण (रा. श्रीगोंदा), शरद झुंबर होले (रा. होलेवस्ती, श्रीगोंदा), संदीप श्रीरंग शिंदे (रा. आढळगाव), राजू भानुदास सातव (रा. श्रीगोंदा), सोपान नारायण सिदनकर (रा. श्रीगोंदा), दत्तात्रय किसन राऊत (रा. शेडगाव), सिदनकर झुंबर किसन (रा. श्रीगोंदा), शेंडगे संतोष दिलीप (रा. श्रीगोंदा), भाऊ मारुती कोथिंबीरे (रा. साळवण देवी रोड), महेश सुरेश मडके (रा. लोणीव्यंकनाथ, मडकेवाडी) आणि परशुराम गोविंद सोनवणे (रा. टाकळी कडेवळीत) यांचा समावेश आहे. हे प्रकरण दिनांक १ मे २०२३ ते १ जुलै २०२३ दरम्यान घडले.
राजेंद्र फकिरा निकम, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १ सहकारी संस्था, अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७७(अ) आणि ३5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रभाकर निकम करीत आहे.
श्रीगोंदा बाजार समितीमध्ये सचिव डेबरे यांनी काही व्यापारी आणि शेतकरी याना हाताशी धरून कांद्यामध्ये गैरव्यवहार केला असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी टिळक भोस यांनी दिली होती.