NEET कौन्सिलिंगबाबत मोठी अपडेट : सर्वोच न्यायालयाची NTA ला नोटीस, ८ जुलैला पुढील सुनावणी

सर्वोच न्यायालयाची NTA ला नोटीस, ८ जुलैला पुढील सुनावणी
NEET 2024 – सर्वोच्च न्यायालयाने नीट (NEET) प्रकरणी परीक्षेचे आयोजन करणाऱ्या एजन्सी NTAला नोटीस जारी केली आहे. परीक्षेची पवित्रता प्रभावित झाली आहे. त्यामुळे याबाबत NTAने स्पष्टीकरण दिले पाहिजे असे, सर्वोच्च न्यायालायने म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास कौन्सिलिंगला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी आता 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. कोर्टाने NTA ला नोटीस दिली असून या प्रकरणातील यापूर्वीच्या याचिकाही या सोबतच विचारात घेतल्या गेल्या आहेत.
दरम्यान, अॅडव्होकेट मॅथ्यूज जे यांनी प्रवेशासंबंधीची प्रक्रिया थांबवावी, असे निर्देश देण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. मात्र, कोर्टाने ती फेटाळून लावली आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठीच्या NEET परीक्षेचा निकाल 4 जूनला लागला. विविध कारणांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेत, परीक्षेचे आयोजन योग्य प्रकारे करण्यात आले नसल्याचे म्हणत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली होती. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली होती.
नीट परीक्षेचा निकाल 14 जून रोजी जाहीर काण्यात येईल असे सांगण्यात आले होते मात्र त्यापूर्वीच ४ जून रोजी अचानक NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 5 मे रोजी यावर्षीची नीट परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23.33 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
या NEET परीक्षेची तयारी करून घेणारे कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांनी या निकालांबद्दलचे काही गंभीर आक्षेप मांडले आहेत. परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच 67 मुलांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले असल्याचा प्रकार घडला आहे. २०२३ मध्ये देशभरातून फक्त दोन मुलांना असे शंभर टक्के मार्क मिळाले होते. नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी यासाठी पालकांसह विद्यार्थी देखील आंदोलन करत आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच नीट प्रतिक्षेसंबंधी याप्रकारे संशय व्यक्त केला जात आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वेळवर प्रश्नपत्रिका मिळाली नाही त्यांना त्यांचा वेळ फुकट गेल्याबद्दल काही मार्क देण्यात आल्याने असा स्कोअर मिळाल्याचे स्पष्टीकरण NEET चं आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दिले आहे. तसेच परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही वा प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे म्हणत NTAने सर्व आरोप फेटाळले आहेत.
आता ८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात याबाबत पुढील सुनावणी होणार आहे. त्यामध्ये काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.