मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; ३० दिवसांचा अल्टिमेटम… सरकारला इशारा

मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; ३० दिवसांचा अल्टिमेटम… सरकारला इशारा
Jalana – मराठा आरक्षण द्यावे आणि त्यासोबतच सगे-सोयऱ्यांची अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले होते.मात्र आज 13 जून रोजी सहावा दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून जरांगे यांची प्रकृती खालावली होती. अखेर राज्य सरकारची मध्यस्थी यशस्वी झाली असून जरांगे पाटील यांनी एक महिन्यांसाठी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला एक महिन्यांचा वेळ द्यावा, अशी विनंती मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली होती. त्यानंतर जरांगे यांनी हे उपोषण स्थगित केले आहे. तसेच ३० दिवसात प्रश्न मार्गी लागला नाही तर विधानसभा लढवण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे ही विनंती करण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई यांचे शिष्टमंडळ अंतरवली सराटीमध्ये आले होते. यापूर्वी छत्रपती संभाजीनगचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. सगेसोयऱ्यासह मराठा आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे. हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवण्यात येईल. यावरील हरकती मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येतील. याबाबतच्या सर्व तांत्रिक गोष्टींची पूर्तता लवकर करण्यात येईल, असे आश्वासन शंभुराजे देसाई यांनी दिले आहे. त्याचबरोबर याबाबत जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होईल असेही देसाई यांनी म्हटले आहे. तसेच उद्या याबाबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सरकारी शिष्टमंडळातील खासदार संदिपानजी भुमरे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आ. राजेंद्र राऊत, मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह अन्य सहकारी, स्थानिक पदाधिकारी आणि मराठा समाजातील बंधू-भगिनी उपस्थित होते.