शेवगावात शेअरमार्केट फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

शेवगावात शेअरमार्केट फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
शेवगाव (प्रतिनिधी) – शेवगाव तालुक्यात शेअरमार्केटच्या माध्यमातून अधिकच मोबदला देण्याचे सांगून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पैसे घेणारे फरार झाले आहेत. यातीलच दोन संख्या भावांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील गदेवाडी येथे इन्वेस्टींग डॉट कॉम नावाने अक्षय इंगळे आणि अविनाश इंगळे यांनी शेअरमार्केटचे ऑफिस सुरु केले होते, दरम्यानच्या काळात त्यांनी शेअरमार्केटच्या माध्यमातून अधिकचा मोबदला देण्याच्या नावाखाली तालुक्यातील आणि बाहेरील लोकांकडून गुंतवणूक करून घेतली, त्यामाध्यमातून सुमारे २६ लोकांची ८३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
तालुक्यातील अनेक भागात आणि शहरात असे अनेक एजंट असून त्यांनी देखील अशाचप्रकारे फसवणूक केल्याचे चर्चिले जात आहे. ज्ञानेश्वर उर्फ माउली अधिक धनवडे (रा. गदेवाडी, ता.शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात अक्षय इंगळे आणि अविनाश इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. गुन्हा दाखल होताच भीतीने अनेक एजंट फरार झाले आहेत.
वकिलांचे गुंतवणूकदारांना सहकार्य
शेवगाव तालुक्यातील सुमारे 25 ते 30 शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी ॲड. आकाश लव्हाट, ॲड. सुहास चव्हाण व ॲड. अतुल लबडे यांच्याशी संपर्क साधून हकीकत सांगितली, त्यानंतर वकिलांनी गुंतवणूकदारांना सहकार्य करून पोलिसांना याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर आज संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी वरील वकील मंडळींनी गुंतवणूकदारांना विशेष सहकार्य केले.