राज्यातील दुष्काळी भागात 1245 चारा डेपो सुरु करण्यास मंजुरी : ना. विखे पाटील

राज्यातील दुष्काळी भागात 1245 चारा डेपो सुरु करण्यास मंजुरी : ना. विखे पाटील
मुंबई – राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले, तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पावसाचे प्रमाण झाले नसल्याने राज्यातील 1245 महसुली मंडळात चारा डेपो उभारण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
राज्यातील पाण्याची उपलब्धता आणि पर्जन्यमान याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विखे पाटील म्हणाले कि, पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस अनेक ठिकाणी पडलेला नाही यासमुळे अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. सध्या राज्यात 512.58 लाख मॅट्रिक टन हिरवा चारा तर 144.55 लाख मॅट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे. हा चारा जून पुरेल असा अंदाज शासनाकडून व्यक्त केला आहे.
तसेच राज्यातील ज्या भागात दुष्काळ आहे किंवा तशी परीस्थिती आहे तेथे चार डेपो किंवा छावण्या सुरु करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यासाठीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराजे देसाई, राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर आदी उपस्थित होते.
दुष्काळी भागात सरकारी यंत्रणा सज्ज : ना. विखे
राज्यातील पावसाचा अंदाज घेऊन पिकांच्या पेरणीची माहिती घेतली आहे. तसेच बी बियाणे आणि खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी यंत्रणा उभी करण्याचे आदेश दिले आहेत तसेच ज्या भागात अद्यापही दुष्काळ आहे तिथे चारा डेपो उभे करण्याचे निर्देशही दिले आहेत असे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.