काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करणार : अमित शहा

काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करणार : अमित शहा
Amit Shaha Meeting : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दि. १६ जून रोजी जम्मू काश्मीरमधील दहशतवादाच्या मुद्द्यावर महत्त्वाची बैठक घेतली. सुरक्षा दलांना जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा खात्मा करण्याचे आणि आगामी अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश अमित शाह यांनी यावेळी दिले.
केंद्रीय मंत्री शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी नवी दिल्लीत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक झाली. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, आयबीचे संचालक तपन डेका, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव अटल दुल्लू आदी या बैठकीसाठी उपस्थित होते.
दरम्यान अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचीही माहिती घेतली. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, महामार्ग, संवेदनशील संस्था आणि संवेदनशील ठिकाणांवर दिवसरात्र देखरेख ठेवावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तसेच दहशतवाद आणि त्याच्या समर्थकांवर कारवाई करण्यासाठी सर्व प्रकारची संसाधने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिले. तसेच अशीच बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.