जिल्हा सहकारी बँकांनी शेतकर्यांना पीक कर्ज वेळेत द्यावे : सहकारमंत्री वळसे पाटील याच्या अधिकार्यांना सूचना

जिल्हा सहकारी बँकांनी शेतकर्यांना पीक कर्ज वेळेत द्यावे : सहकारमंत्री वळसे पाटील याच्या अधिकार्यांना सूचना
पुणे – राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, शेतकर्यांना वेळेत पीककर्ज वाटप करावे, अडचणीतील जिल्हा सहकारी बँकांना राज्य सहकारी बँक सर्वोतोपरी सहाय्य करण्यात येईल, विभागीय अधिकार्यांनी नवीन सहकारी सोसायट्यांची स्थापना करावी, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच अधिकार्यांना सूचना केल्या आहेत.
पुणे येथील साखर संकुल येथील राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीचा व पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रविण दरेकर, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त दीपक तावरे, अपर आयुक्त व विशेष निबंधक शैलेश कोतमिरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, माजी आमदार नगर जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, आमदार मानसिंगराव नाईक आदी यावेळी उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून त्याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा. आर्थिक अडचणीतील नागपूर आणि नाशिक या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा कृती आराखडा सादर करणे बाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. या बँकांची स्थिती सुधारण्यासाठी वेगळी योजना राबविण्याबाबत विचार करण्यात यावा. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थिती, पीक कर्ज वाटप, सहकारी कर्जवसुली याकडे बँकांनी लक्ष द्यावे, तसेच सर्व व्यवहार पारदर्शक होतील याची काळजी सर्वांनी घेतली जावी. बँकांनी शेतकर्यांना कर्जवाटप करावे अशा सूचना वळसे पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या. तसेच यापुढे सर्व जिल्हा बँकांना सहकार्य करू किवा त्यासाठी आवश्यक योजना राबवू असेही त्यांनी म्हटले आहे.