डॉ. सुजय विखे यांच्याकडून 18 लाख रुपये भरत निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी

डॉ. सुजय विखे यांच्याकडून 18 लाख रुपये भरत निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत झाली होती त्यामध्ये निलेश लंके यांचा विजय झाला होता. मात्र आता डॉ. सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्क देखील भरले आहे.
या केंद्रांचा आहे समावेश
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत- जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.
राजकीय चर्चांना उधाण
खा. निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा 28 हजार 929 मतांनी पराभव केला होता. मात्र आता डॉ. विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 10 जून रोजीच निवडणूक आयोगाकडे विखे यांनी हि मागणी केली आहे. मात्र याबाबत विखे यांच्याकडून गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत सांगितले आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक आयोगाने पुढे पाठवला आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विखे पाटील यांचे आशीर्वाद घेणार : लंके
जिल्ह्यात यापुढे सहमतीचे राजकारण करणार आहे. विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान आहे. मी कुठेही गेलो तरी विखे कुटुंबीय आमच्या नगरचे असल्याचे सांगत असतो. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणार आहे, अशी माहिती खा. निलेश लंके यांनी दिली.