तालुक्याच्या पाणीदार विकासासाठी काकडे यांना विधानसभेत संधी द्या : मकरंद अनासपुरे

तालुक्याच्या पाणीदार विकासासाठी काकडे यांना विधानसभेत संधी द्या : मकरंद अनासपुरे
प्रस्थापितांनी तिकीट चोरले ; आता माघार नाही : सौ. काकडे
दादासाहेब डोंगरे
शेवगाव (प्रतिनिधी) – कोणतीही मोठी सत्ता नसतांना सत्तेच्या विरोधात राहून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या सौ.काकडे ताई यांचे काम पाहून थक्क झालो. अशा चांगल्या माणसांना विधानसभेची संधी दिली तर तालुक्यामध्ये पाणीदार विकास होऊ शकतो. असे प्रतिपादन नाम फाउंडेशनचे सदस्य व विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शेवगाव येथे केले.
शेवगाव येथे जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या समर्थनार्थ जनशक्ती तर्फे वज्र निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास ॲड.विद्याधर काकडे, जगन्नाथ गावडे, ह.भ.प.नारायण महाराज गर्जे, ह.भ.प.मीनाताई मडके, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बटुळे, मा.जि.प.सदस्य पवन कुमार साळवे, रामभाऊ साळवे, गोरक्ष कर्डिले, भाऊसाहेब बोडखे, नगराध्यक्ष विनोद मोहिते, सरपंच वैभव पुरनाळे, अनिल साबळे, सुनील गरुड, सुभाष सबनीस, अशोक ढाकणे, अल्ताफ शेख, बाळासाहेब कचरे, विनायक काटे, नवनाथ फुंदे, सुनील दारकुंडे, सुनील काटे, नारायण टेकाळे, भाऊसाहेब मडके, रामराजे लाखे, ॲड.संजय काकडे, भारत लांडे, रज्जाक शेख, देविदास गिर्हे, संतोष राठोड, धाराभाऊ राठोड, राधाकिसन शिंदे, माणिक गर्जे, भगवान डावरे आदी यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी ताजनापुर लिफ्ट टप्पा क्र. 2 मधील लढवय्या शेतकऱ्यांचा प्राथमिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. आणि ‘जिंकूनी आणले पाणी’ तसेच ‘पाऊले सामर्थ्याची’ या सौ. काकडे यांच्या कार्यपुस्तकाचे प्रकाशन मकरंद अनासपुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी अनासपुरे म्हणाले की, एवढी चांगली माणसं पाण्यासाठी संघर्ष करत आहेत व त्यांचा हा संघर्ष वडिलांपासूनचा आहे. सौ हर्षदा काकडे या कोणताही प्रश्न हाती घेतला तर सोडवल्याशिवाय हटत नाहीत. कोणतेही मोठे पद नसताना लढत राहण हे सोपं काम नसतं. काकडे दांपत्यांनी कोविडकाळामध्ये उभारलेली दोन कोविड सेंटर गोरगरिबांच्या मुलांसाठीचे वसतीगृह, ताजनापूर लिफ्टसाठीचा लढा, खरोखरच कौतुकास्पद असा आहे. ही माणसं चांगली आहेत म्हणून त्यांना यावेळी साथ द्या व सौ.हर्षदा काकडे यांना विधानसभेत पाठवा असेही अनासपुरे म्हणाले.

काकडे म्हणाल्या की, प्रस्थापित पुढाऱ्यांनी आलटून पालटून आत्तापर्यंत सत्ता भोगल्या आहेत. सत्तेचा उपभोग त्यांनी फक्त आपला कारखाना वाचवणे व स्वहित साधने एवढाच केला आहे. सर्व सत्ता त्यांना त्यांच्याच घरात लागतात. जिल्हा बँक, पंचायत समिती, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, आमदारकी या सर्व सत्ता यांच्याकडेच आहेत मग यांना विकास का करता आला नाही. फक्त टक्केवारीसाठी यांना पदे लागतात. आणि आता हेच परिवर्तन यात्रा घेऊन फिरताहेत. प्रत्येक पक्ष यांनी वाटून घेतलेले आहेत. दहा मिनिटात हे पक्ष बदलतात. आमचे मिळालेले तिकीट आर्थिक बाजार करून यांनी चोरून नेले असे यांचे काम चालू आहे म्हणून यांना आता सर्वसामान्य जनताच पालथ करणार आहे. आता कुठल्याही परिस्थितीत मी तुमच्या सर्वसामान्यांचे बळावर विधानसभा गाठणार आहे. प्रस्थापित पुढाऱ्यांनी ५० वर्षात केला नाही एवढा विकास करनार आहे. कुणाच्या दबावाला घाबरू नका ध्यानात ठेवा मी आता माघार घेणार नाही. पक्षाकडे मागणी केली आहे जर पक्षाने तिकीट दिले तर दिले नाहीतर तुमच्या जीवावर निवडणूक लढवणार व जिंकूनही येणार असेही त्या म्हणाल्या.
यावेळी श्रीमती मंदाकिनी पुरणाळे यांनी 25 हजाराचा धनादेश नाम फाउंडेशनसाठी मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड व गोविंद वाणी यांनी प्रास्ताविक भाऊसाहेब सातपुते यांनी तर आभार जगन्नाथ गावडे यांनी मानले.
सर्वोच्च गर्दी !
खंडोबानगर शेवगाव येथे आजपर्यंत राष्ट्रीय, स्थानिक नेत्यांच्या अनेक सभा झाल्या परंतू एवढी गर्दी कोणत्याच सभेला नव्हती गर्दीचा एक नवा उचांक येथे बघायला मिळाला हर्षदा काकडे या निवडणूकीच्या रेसमध्ये नसून त्याच्यावर कोणत्याही कार्यकर्त्यांनी भाष्य करू नये असे सांगणाऱ्या आमदार मोनिका राजळे यांना मात्र जनतेने चांगलीच चपराक दिली आहे हे आजच्या गर्दीवरून दिसुन येते .1