सचिन, ब्रॅडमन याना जमले नाही ते ‘या’ खेळाडूने करून दाखवले, 147 वर्षांच्या इतिहासातील पहिली घटना !

सचिन, ब्रॅडमन याना जमले नाही ते 'या' खेळाडूने करून दाखवले, 147 वर्षांच्या इतिहासातील पहिली घटना !
Ollie Pope : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डॉन ब्रॅडमन आणि भारताचा सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील दोन ‘ऑल टाईम ग्रेट’ खेळाडू मानले जातात. कोणत्याही बॅट्समनने केलेल्या सर्वोच्च कामगिरीची तुलना त्यांच्या रेकॉर्डशी केली जाते. श्रीलंकाविरुद्धच्या सीरिजमधील इंग्लंडचा कॅप्टन ऑली पोप (Ollie Pope) याने या दोघांनाही कधी जमली नाही, अशी कामगिरी केली आहे. इंग्लंडचा नियमित कॅप्टन बेन स्टोक्स सध्या जखमी आहे. त्याच्या गैरहजेरीत पोप या सीरिजमध्ये कॅप्टनसी करतो आहे.
पोपच्या कॅप्टनसीमध्ये इंग्लंडनं दोन टेस्ट सहज जिंकल्या आहेत. मात्र, बॅटर म्हणून त्याची कामगिरी साधारण राहिली आहे. पोपला पहिल्या चार इनिंगमध्ये फक्त 30 रन काढता आले होते. परंतु, शुक्रवारपासून (6 सप्टेंबर) ओव्हलवर सुरु झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये पोप या खेळाडूने खराब फॉर्मची भरपाई केली आहे. श्रीलंका विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी पोपने नाबाद 103 रन काढले. त्याच्या सेंच्युरीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट आणि २२१ रान असा मोठा स्कोअर केला आहे.
दरम्यान पोप याने ओव्हलवरील पहिली आणि त्याच्या टेस्ट कारकिर्दीमधील सातवी सेंच्युरी झळकावली आहे. विशेष म्हणजे पोपच्या पहिल्या सातही सेंच्युरी टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सात वेगवेगळ्या देशांविरुद्ध आल्या आहेत. डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकरसह 147 वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात कुणालाही जमला नाही, असा विक्रम पोप याने केला आहे. पोप पहिल्या दिवसाच्या अखेरीस 103 बॉलमध्ये 103 रन काढून नाबाद होता. या खेळीत त्याने 13 फोर आणि 2 सिक्स लगावले. त्यामुळे मोठा स्कोअर उभा करण्यात इंग्लंड टीमला जमले.