फडणवीस राजकीय अडचणीत, स्वकीयांमुळेच : थोरात

फडणवीस राजकीय अडचणीत, स्वकीयांमुळेच : थोरात
अहमदनगर (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत आहेत, ही वस्तुथिती आहे परंतु त्यांची ही अवस्था त्यांच्या पक्षानेच केली असून ती विरोधकांनी केली नाही. तसेच ज्यांना जेलमध्ये टाकतो असे म्हणत जनतेची मते घेतली त्यांनाच सोबत घेतले, त्याचमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत असा टोला काँग्रेसचे नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस याना लगावला आहे.
दरम्यान, मी आधुनिक अभिमन्यू असून माझ्याभोवती रचलेले चक्रव्यूह कसे तोडायचे हे मला ठाऊक आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या याच वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी वरील वक्तव्य केले. आ. बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील ‘सुदर्शन’ निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस राजकीय अडचणीत
देवेंद्र फडणवीस हे शंभर टक्के राजकीय अडचणीत आहेत. मात्र हे ही लक्षात घ्यावे लागेल की देवेंद्र फडणवीसांची आजची स्थिती कुणी दुसऱ्याने केली नाही. ती त्यांच्या पक्षानेच केली आहे, विरोधकांनी नव्हे. ज्यांना चक्की पिसिंग म्हणून जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला, त्यांनाच सोबत घेण्याची जबाबदारी फडणवीसांवर टाकण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आले ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी स्वतःला अभिमन्यूची उपमा दिली. मात्र चक्रव्यूहातून बाहेर पडताना या अभिमन्यूची अवस्था काय होणार हे माहिती नाही, असा उपरोधिक टोला आ. थोरात यांनी फडणवीस याना लगावला.
मराठा समाजाला आरक्षण द्या, आमचा पाठिंबा …
सरकार त्यांचे आहे, सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाची मागणी पूर्ण करा आम्हीही पाठीशी राहू. विरोधकांना प्रश्न विचारत आहेत म्हणजे ते पळवाट शोधत आहेत. सरकारने जरांगे यांच्याशी नवी मुंबईत काय तडजोड केली आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही विरोधकच आहोत, आमच्याकडून काय अपेक्षा करता? असे थोरात यांनी यावेळी म्हटले आहे.