sanjay shirsat : शिरसाठ “सिडको” तर पाटलांची “हळद संशोधन” महामंडळावर नियुक्ती !

शिरसाठ "सिडको" तर पाटलांची "हळद संशोधन" महामंडळावर नियुक्ती !
मुंबई – शिंदे-फडणवीस नंतर पवार मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र शिंदे गटातील इच्छुक मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि मंत्रिपद मिळेल असे म्हटले मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून काही वर्ष उलटून देखील विस्तार काही झाला नाही. आता मंत्रिमंडळात स्थानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांची (sanjay shirsat) महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे. संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तशा प्रकारचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. भरत गोगावले अद्याप प्रतिक्षेतच असल्याचे दिसतेय.

तसेच शिंदे गटाचे हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांचे देखील राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
शासन निर्णय
०१. शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या आर्टिकल ऑफ असोशिएशन मधील आर्टिकल २०२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरुन श्री. संजय शिरसाट, वि.स.स. यांची शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या अध्यक्ष पदावर (मंत्री दर्जा) नियुक्ती करण्यात येत आहे.
०२. श्री. संजय शिरसाट, अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) यांना वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक शासाऊ-१०.०२/प्र.क्र.०६/०३/सा.उ., दि.२२ ऑगस्ट, २००३ आणि शासन निर्णय क्रमांक शासाऊ १०.१०/प्र.क्र.९६/१०/सा.उ., दि.१३ मार्च, २०१२ मधील तरतुदींनुसार सेवा सुविधा उपलब्ध असतील.
०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९१६१६२४३०६५२५ असा आहे. सदरहू शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.