congress : कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांना मदत, गृह खात्यावर नाराज काँग्रेस शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन

congress : कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांना मदत, गृह खात्यावर नाराज काँग्रेस शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन
मुंबई – राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थैर्य निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये, शेतकरी वर्गात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे. ही सर्व परिस्थिती राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निदर्शनास आणण्यासाठी आज दि. २१ रोजी काँग्रेसच्या (congress) शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाकडून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार चंद्रकांत हंडोरे, विशाल पाटील, आमदार अस्लम शेख, अमीन पटेल, आमदार नितीन राऊत, आमदार विश्वजित कदम, आरिफ नसीम खान, विक्रम सावंत, सचिन सावंत आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. हा पुतळा कोसळणे म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळणे आहे. तरी अजून या सबंधित लोकांवर कारवाई झालेली नाही. संबंधितांवर कठोर कारवाई करावी. काँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात सत्ताधारी आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बंडे यांनी हिंसक विधान केली. या विधानानी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आणि पोलिसांनी खेदाने बघ्याची भूमिका घेतली. गुन्हा दाखल करण्यासाठी देखील काँग्रेस नेत्यांना आंदोलन करावी लागली त्यानंतर गुन्हे दाखल झाले, पण आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. या दोन्ही लोकप्रतिनिधींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
तसेच महाराष्ट्रात प्रक्षोभक विधान करून देखील आमदारावर पोलिस कारवाई करत नाही याचा अर्थ राज्यात दंगली घडवण्याचा सत्ताधारी पक्षांचा कट आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.असेही निवेदनात म्हटले आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचे सुमारे सहा लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. अजूनही याचे पंचनामे झालेले नाहीत. त्यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. विधानसभा निवडणूक निर्भय वातावरणात होईल याबाबत शंका आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारात मोठयाप्रमाणावर वाढ झाली असून अल्पवयीन, शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या बदलापूर व नागपूर येथे घडलेल्या गुन्ह्यात आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. स्पर्धा परीक्षा रखडल्या आहेत. उमेदवारांना सरकारकडून नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. राज्यातील ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सरकारला निर्देश द्यावेत, अशी राज्यातील जनतेची आपणाकडून अपेक्षा आहे, असे काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कडक कारवाईचे निर्देश देऊ – राधाकृष्णन
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्वासन काँग्रेस शिष्टमंडळाला दिले आहे. त्याचबरोबर वादग्रस्त विधानबाबत गृह खात्याकडून माहिती घेऊन कडक कारवाई करण्याचे आश्वासनही राज्यपाल यांनी दिले.