डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयमधील ३९ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयमधील ३९ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
अहमदनगर (प्रतिनिधी) – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळद घाट येथील आयटीआयचे ३९ विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये निवडले गेले आहेत. या विद्यार्थ्यांना औरंगाबाद येथील रत्नप्रभा मोटर्स (जेसीबी) आणि अहमदनगर येथील इंडोक्लब ऑटो कॉम प्रा. लिमिटेड यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी प्राप्त झाली आहे.
मंगळवारी, २४ सप्टेंबर रोजी या दोन्ही कंपन्यांच्या मुलाखती अहमदनगर एमआयडीसी आयटीआय परिसरात आयोजित करण्यात आल्या होत्या. एकूण ४९ विद्यार्थ्यांनी या मुलाखतींमध्ये सहभाग नोंदवला होता, त्यापैकी ३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये फिटर विभागातून ५, मोटार मेकॅनिक १५, डिझेल मेकॅनिक १०, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ५, आणि वायरमन विभागातून ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती प्राचार्य ए. व्ही. सूर्यवंशी यांनी दिली.
आयटीआय महाविद्यालयाच्या एमआयडीसी परिसरामुळे विद्यार्थ्यांना नेहमीच मोठा फायदा होत असतो. संस्थेचे यंत्रसामग्रीने सुसज्ज वर्कशॉप, अनुभवी शिक्षक, क्रीडा मैदान, आणि निसर्गरम्य वातावरणामुळे महाविद्यालय जिल्ह्यात लोकप्रिय आहे. संस्थेने विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महसूल मंत्री व संस्थेचे चेअरमन ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, डायरेक्टर पी. एम. गायकवाड, डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे, आणि डेप्युटी डायरेक्टर सुनील कलापुरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.