adani foundation : चंद्रपूर : कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापन :अदानी फाउंडेशन”कडे ; वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

adani foundation : चंद्रपूर : कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापन :अदानी फाउंडेशन"कडे ; वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
चंद्रपूरमधील एका कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापन अहमदाबादच्या अदानी फाउंडेशनकडे (adani foundation) देण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. चंद्रपूरमधील माउंट कार्मेल या कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे देण्यात आले आहे. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन आदेश काढला आहे. चंद्रपूरच्या शाळेचा हाच पॅटर्न महाराष्ट्रातील इतर शाळांमध्ये सुद्धा राबवला जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. ही कॉन्व्हेंट शाळा विनाअनुदानित असून याचे संपूर्ण व्यवस्थापन आता अदानी फाउंडेशन पाहणार आहे. त्यामुळे राज्यात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र या निर्णयामुळे सरकारवर टीका केली असून आता पाहापुरूषांसोबत अदानी यांचा फोटो लावायचेच राहिले आहे असे म्हटले आहे.

चंद्रपूर शहराजवळ घुगुस हे औद्योगिक शहर आहे. या शहरात कोळसा खाणी आणि सिमेंट उद्योग आहेत. एसीसी या नामांकित सिमेंट उत्पादक कंपनीचा कारखाना इथे आहे. काही वर्षांपूर्वी अदानी समूहाने एसीसी ची मालकी घेतली. याच उद्योगात असलेली कामगार पाल्यांसाठीची शाळा याआधी मिशनरी संस्था असलेली माउंट कार्मेल संस्था चालवत होती. उद्योगाची मालकी एसीसी कडून अदानी समूहाकडे गेल्यानंतर शाळेचे अदानी फाउंडेशन शाळा असे नामकरण करत त्यासंबंधीचा प्रस्ताव अदानी समूहाने शिक्षण विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार ही उद्योगाच्या ”इन हाऊस” चालवली जाणारी शाळा अदानी फाउंडेशन ला हस्तांतरित होणार आहे. ही शाळा सरकारी अथवा जिल्हा परिषदेची नाही.
महाराष्ट्राचा ७/१२ अदानीच्या नावे लिहिणार का महायुती सरकार? : वडेट्टीवार
महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा ७/१२ च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवलं आहे का?. शाळेच्या भिंतीवर आदराने आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांसोबत आता गौतम अदानी यांचा पण फोटो लावायची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारकडून सुरू झाली आहे,अशी टीका विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.