KRUSHI PURASKAR : राज्यातील ४४८ शेतकरी, संघटना, अधिकाऱ्यांना कृषी पुरस्कार ; मुंडेंच्या वक्तव्याने शेतकरी संतप्त

KRUSHI PURASKAR : राज्यातील ४४८ शेतकरी, संघटना, अधिकाऱ्यांना कृषी पुरस्कार ; मुंडेंच्या वक्तव्याने शेतकरी संतप्त
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील सुमारे ४४८ कृषी पुरस्काराचे (KRUSHI PURASKAR) विविध शेतकरी, शेतकरी संघटनांना तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याच्या हस्ते वितरण करण्यात आले. मात्र कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना शेतकरी संतप्त होतील असे वक्तव्य केले होते. त्यामुळे काहीकाळ गोंधळ उडाला होता. उपस्थित शेतकरी संतप्त झालेले पाहायला मिळाले.

कृषी पुरस्कार (KRUSHI PURASKAR) वितरण कार्यक्रम मुंबईतील वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या सभागृहात पार पडला. हे पुरस्कार 2020, 2021 आणि 2022 अशा तीन वर्षांचे पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, मंत्री दीपक केसरकर यांच्यासह शेतकरी आणि कुटुंबीय आदी उपस्थित होते.
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे २५०० कोटींचे अनुदान सोमवारी DBT द्वारे वितरीत केले जाईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच शून्य मागास आणि शून्य पुढील बिलासह वीजबिल प्राप्त होईल, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले.
या कार्यक्रमादरम्यान नैसर्गिक आपत्ती आली की, मला शिव्या पडतात, त्यामुळे रात्रभर मला उचक्या लागतात असं कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. मात्र काही काळाने पुरस्कार वितरण पुन्हा सुरु झाले.
सरकारकडून शेतकऱ्यांचा अपमान – वडेट्टीवार
आज मुंबई येथे शेतकऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण या कार्यक्रमात सरकारने शेतकऱ्यांना चुकीची वागणूक दिल्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचा व्हिडिओ पुढे आला आहे. शेतकऱ्यांना न्याय तर द्यायचा नाही, वरून स्वतःच्या जाहिरातीसाठी शेतकऱ्यांना राज्याच्या राजधानीत बोलावून त्यांना अपमानित करायचे हे पूर्णतः चुकीचे आहे. नैसर्गिक आपत्ती आली की मला शिव्या पडतात, त्यामुळे रात्रभर मला उचक्या लागतात असं कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणतात. आज ज्या पद्धतीने महायुती सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे ते बघता विधानसभा निवडणूक पूर्ण होत पर्यंत आता कृषिमंत्र्यांसोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिघांच्या उचक्या थांबणार नाही. त्यामुळे उचक्या लागतील अशी काम या सरकारने करू नये, अशी टीका विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.