Baba Siddique Death : बाबा सिद्दीकी यांची हत्या ; बिष्णोई गँगचा हात?, सरकारवर विरोधकांची टीका

बाबा सिद्दीकी यांची हत्या ; बिष्णोई गँगचा हात?, सरकारवर विरोधकांची टीका
राजकीय नेत्यांसह कलाकारांची रुग्णालयात हजेरी
Baba Siddique Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी (baba siddique) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री हि धक्कादायक घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. बाबा सिद्दीकी यांच्या दसऱ्याच्या दिवशी प्राणघातक हल्ला केल्यामुळे हत्ये मागील कारण नक्की काय होते हे समजू शकले नाही. मात्र सलमान खान यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने सिद्दीकी यांची बोष्णोई गॅंगने हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तीन आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केलं आहे. तर, तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. करनैव सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावं आहेत. करनैल हरियाणा आणि धर्मराज यूपीचा रहिवाशी असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांच यूनिट 3 मध्ये दोन आरोपींना ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून बाबा सिद्दीकी यांच्या घराची रेकी करत होते. लॉरेंस बिश्नोईचा खास व्यक्ती रोहित गोदारा याने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता.
बाबा सिद्दीकी यांची अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्याशी चांगली मैत्री होती. रमजान आणि इफ्तार पार्टीमध्ये देखील याना अनेकदा एकत्र पहिले गेले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या जीवाला देखील धोका असल्याचे म्हटले जात असून सलमान खान याच्या ‘बिग बॉस 18’ शोची शुटिंग देखील थांबवण्यात आली आहे. शिवाय सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार आणि 2004-2008 या काळात मंत्री राहिलेले सिद्दिकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच रात्री उशिरापर्यंत लिलावती रुग्णालयात नेते, कलाकार यांची रीघ लागली होती.
बिश्नोई गँगच्या सदस्याचा पोस्टमधून खुलासा…
ओम जय श्री राम जय भारत. मला जीवनाचा अर्थ माहिती आहे. मी शरीर आणि पैसा ही धूळ असल्याचे समजतो. मी जे केले ते चांगले काम होते. मी जे काही केले ते मैत्रीच्या धर्माचे पालन होते. सलमान खान आम्हाला ही लढाई नको होती. पण तू आमच्या भाईचे नुकसान केले आहे. आज बाबा सिद्दीकी किती चांगले होते, हे सांगितले जात आहे. पण एकेकाळी ते दाऊदसोबत मोक्का कायद्याखाली होते. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्यांचे बॉलीवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध आहेत. आमची कोणासोबतही दुश्मनी नाही. पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करील, त्याचा आम्ही हिशोब नक्की करु. आमच्या गँगमधील कोणत्याही भाईला मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही प्रतिक्रिया नक्की देऊ. आम्ही याआधी कधीही वार केलेला नाही. जय श्री राम, जय भारत, असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान शुभ्भू लोनकर महाराष्ट्र या फेसबुक अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे. हे फेसबुक अकाऊंट बिश्नोई गँँगशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. या पोस्टद्वारे बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. पोलीस याचा तपस करत आहेत.
सर्वानाच धक्का बसला आहे : देवेंद्र फडणवीस
ही दुर्दैवी आणि अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. बाबा सिद्दिकी यांच्याशी माझी स्वतःची निकटची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनेने आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. आता या घटनेतील दोन आरोपी पकडलेले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही धागेदोरे मिळत आहेत. काही अँगल्स लक्षात येत आहेत. मात्र, त्या संदर्भात आता लगेच बोलने योग्य नाही. पोलीस आपले काम करत आहेत. मात्र विरोधकांनी राजकारण करू नये असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दुर्दैवी घटना, सखोल चौकशी व्हावी : अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ : विजय वडेट्टीवार
सध्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, कोण सुरक्षित आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ आहे. सत्ताधाऱ्यांनी फलक लावून लोकांना सांगायला पाहिजे की, आपली सुरक्षा आपण करा, असे असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. सत्ताधारी योजना व सत्ता मिळवण्यात व्यस्त आहे. त्यामुळे पोलिसांचे इंटेलिजन्स काम करत नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले नाही तर गुंडांचे राज्य आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मी बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेतून सावरण्याची शक्ती मिळेल, अशी प्रार्थना करतो, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
हत्येची गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांची देखील जबाबदारी : भुजबळ
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले कि, हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील आहे’. धमकी दिल्यानंतर आणि सुरक्षा दिल्यानंतर देखील पोलिसांनी काहीच केले नाही? मुंबई पोलिसासाठी हे एक चॅलेंज आहे. दहा-वीस हजारात ही पोरं हत्या करत आहेत. ही कॉन्ट्रकट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड दिलं पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे, असे म्हणत भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा : राऊत
दिवसा जनतेसमोर रक्तपात, हिंसाचार, दहशत, खंडणीसत्र सुरू आहे. अशा वेळेला राज्याच्या गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? तुरुंगात मारामाऱ्या सुरू आहेत, दंगली सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस हे सर्वात निष्क्रिय गृहमंत्री असून त्यांची हकालपट्टी करा असं सांगण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. विरोधकांच्या बाबतीत काड्या करण्यापेक्षा, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे त्या पदाला कर्तव्यभावनेने जागून काम करा, अशी टीका शिवसेना उबाठाचे नेते खा. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.